
रत्नागिरीमध्ये जर भूकंप झाला तर राज्याच्या इतर कोणत्याही भागापेक्षा सगळ्यात जास्त जिवीतहानी होईल असा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने तयार केलेल्या अहवालाद्वारे देण्यात आला आहे. या अहवालामध्ये कमी, मध्यम आणि सर्वाधिक अशा तीन वर्गात देशातील काही निवडक शहरांची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जिवीतहानीची शक्यता रत्नागिरीसाठी वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये भूकंप झाल्यास जिवीतहानीचे हे प्रमाण ‘मध्यम’ वर्गवारीतील असेल असं या अहवालात म्हटलं आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने हैदराबादमधल्या आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेसोबत मिळून भूकंपाबाबत संशोधन केलं होतं. हे संशोधन भूकंपाच्या धोक्याचा निर्देशांक तयार करण्यासाठी करण्यात आलं होतं. या संशोधनात 50 शहरांचा आढावा घेण्यात आला होता. ही शहरे प्रायोगिक तत्वावर निवडण्यात आली होती. भूकंपाकडे इशारा करणाऱ्या भूगर्भाखालील हालचाली आणि त्या जिथे होत आहेत त्यावर बसलेली शहरे या संशोधनासाठी निवडण्यात आली होती. यामध्ये रत्नागिरी हे भूकंप झाल्यास मानवीहानी होण्याचे सिमला आणि पानिपतनंतरचे देशातील तिसरे आणि राज्यातील पहिले ठिकाण असल्याचं दिसून आलं आहे.
रत्नागिरीतील 40 टक्के इमारती अशा आहेत ज्या कॉन्क्रीटपासून बनल्या असून भूकंपामुळे कोसळू शकतात. या इमारती बहुमजली असून यांच्या तळाशी पार्किंग किंवा अन्य गोष्टींसाठी मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. भूकंपाच्या दृष्टीने या इमारती अजिबात सुरक्षित नसल्याचं निर्देशांकात दिसून आलं आहे. या इमारती एकमेकाला खेटून किंवा दोन इमारतींमधलं अंतर कमी असल्याने जिवीतहानीची शक्यता वाढते असंही दिसून आलं आहे.
या संशोधनासाठी जी शहरे निवडण्यात आली होती ती जास्त लोकसंख्या असलेली, घरांची समस्या असलेली अशी निवडण्यात आली होती. त्यातही संशोधन हे भूकंपप्रवण क्षेत्र 4 किंवा 5 या वर्गवारीत मोडणाऱ्या जमिनींवर उभी असलेल्या शहरांवर केंद्रीत करण्यात आले होते. या संशोधनासाठी 25 शहरांना प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या तर इतर शहरांमधून माहिती मागवून त्याद्वारे अभ्यास करण्यात आला. 50 मधली 13 शहरे ही संशोधनानंतर वर्गवारीनुसार अत्यंत धोकादायक, 30 शहरे ही मध्यम धोकादायक आणि 7 शहरे ही कमी धोकादायक अशाप्रकारे विभागण्यात आली. हे संशोधन करण्यामागचा मुख्य उद्देश हा जनजागृती करण्याचा आहे. धोकादायक, मध्यम धोकादायक शहरांमधील बांधकाम व्यावसायिक, रचनातज्ज्ञ यांनी इमारती भूकंपाचा आणि जिवीतहानीचा धोका ओळखून तशा पद्धतीने उभ्या कराव्यात हे सांगण्याचा या संशोधनामागचा हेतू आहे.




























































