काबुली चणे खा…आरोग्य सुधारा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काबुली चण्याची चटकदार, मसालेदार उसळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातात. ही उसळ बनवण्यास अत्यंत सोपी तसेच बाजारात वाण्याच्या दुकानात केव्हाही काबुली चणे सहज विकत मिळतात. काही वेळा मांसाहाराऐवजी या उसळीचा पर्याय निवडला जातो. सलाड, टिक्की, उसळ अशा विविध पद्धतीने शिजवलेल्या काबुली चण्याचा आहारात समावेश करता येऊ शकतो. सणा-समारंभाच्या वेळी तर बहुतेक वेळा ही उसळ केली जाते. जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या काबुली चण्यामध्ये आरोग्यदायी गुणधर्मही भरपूर प्रमाणात आहेत.

एक कप काबुली चण्यांमध्ये 12.5 ग्रॅम फायबर असते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याकरिता काबुली चणे खाणे गुणकारी ठरते.

100 ग्रॅम काबुली चण्यामध्ये सरासरी 269 कॅलरी, 4 ग्रॅम फॅट, 34-35 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 9-12 ग्रॅम फायबर, 6-7 ग्रॅम साखर, 10-15 ग्रॅम प्रथिने असतात.

उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी दररोज कमीत कमी 4700 मि. ग्रॅ. पोटॅशियमची आवश्यकता असते. एक कप काबुली चण्यात 474 मि. ग्रॅ. पोटॅशियम असते.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी काबुली चण्याचा विविध पद्धतीने आहारात समावेश करावा. एक कप काबुली चण्यामध्ये 12.5 ग्रॅम फायबर असते. या चण्यांमध्ये सॉल्युबल फायबर असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय शरीरातील विषारी द्रव्येही बाहेर पडण्यास मदत होते. वजन कमी करण्यास फायबरची मदत होते.

आयर्न, कॅल्शियम, जीवनसत्त्व सी, ए, ई, अँण्टीऑक्सिडंट्स आणि इतरही भरपूर जीवनसत्त्वांनी युक्त असलेले काबुली चणे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत.

यामध्ये फॉस्फरस असल्यामुळे दात मजबूत होतात. यासाठी उकडलेल्या काबुली चण्यामध्ये मीठ टाकून खावे.

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण काबुली चणे खाल्ल्याने कमी होते. काबुली चण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून खावे.

काबुली चण्यात आयर्न जास्त प्रमाणात असते. अॅनिमिया असणाऱ्या रुग्णांनी काबुली चण्यात काळे मीठ घालून खाल्ल्यास फायदेशीर ठरते.