आम्ही खवय्ये : खिचडी…

132

सामना प्रतिनिधी । मुंबई

ऋता दुर्गुळे. पथ्य, डाएट सांभाळून खाण्याची मौज करते. आईच्या हातची पिठलं-भाकरी आवडीची.

‘खाणं’ या शब्दाची तुझ्या दृष्टीने व्याख्या काय?
– मी प्रचंड खवय्यी आहे. त्यामुळे मला खायला खूप आवडतं. पौष्टिक खाणं हा आपल्या जीवनशैलीचा एक मार्ग आहे. त्याने आपला मूड बदलू शकतो.

खायला काय आवडतं?
– घरचं सगळं आवडतं. पिठलं-भाकरीही चालते, पण ती आईच्या हातची हवी. माझी आई सुगरण आहे. तिने केलेले सर्व पदार्थ मला खूप आवडतात.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?
– खरं तर आपल्यामध्ये पौष्टिक अन्न खाण्याची आवड निर्माण करावी लागते. कारण त्याच्यात आपण तडजोड करू शकत नाही. त्यामुळे आपलं शरीर सुस्थितीत राहायला मदत होते.

डाएट करता का?
– हो, त्याबाबत सतत प्रयत्न सुरू असतात. पण एक करायला आवडत नाही. तरीही मी सतत डाएटवर नसते.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?
– प्रयोग असेल आणि दौऱयावर असेन तेव्हा बाहेर खाणं होतंच. त्याऐवजी नाही, कारण जिथे चित्रीकरण असतं तिथे मी घरून डबा घेऊन जाते.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता?
– कोणतंही ठराविक नाही. मी खूप फुडी असल्याने सगळीकडचीच चव घ्यायला आवडते.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता?
– प्रयोगानिमित्त दौरे असतात तेव्हा खरं तर माझ्याकडून फार खाणं-पिणं जपलं गेलं नाही, पण सध्या तसे प्रयत्न करतेय. खाण्याची वेळ जपणं फार कठीण जातं अशावेळी. कारण कधी रात्रीचे, दुपारचे प्रयोग असतात.

स्ट्रीट फूड आवडतं का?
-प्रचंड आवडतं. पण आता ते दिवस गेले. आता फार खाणं स्ट्रीटवरचं होत नाही.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?
– आईने बनवलेला प्रत्येक पदार्थ मला आवडतोच.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खाऊ घालता?
– ते पाहुण्यांवर अवलंबून असतं. कारण शूटिंगच्या निमित्ताने मीच घरी नसते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर देणं खरंच खूप कठीण आहे.

उपवास करता का?
– नियमित नाही, पण नवरात्राचे दोन दिवस नक्कीच आवर्जून करते. वर्षातले ते दोन दिवस ठरलेले असतात.

माझी रेसिपी
मला बऱ्यापैकी स्वयंपाक येतो, पण माझ्या बाबांना माझ्या हातची खिचडी खूप आवडते. मला खिचडी करायला खूप आवडते. आपण नेहमी खिचडी करतो तशीच करते. कदाचित ती मी केलीय म्हणून माझ्या बाबांना जास्त आवडते. सुरुवातीलाच फोडणी देताना मला खिचडीत गरम मसाला टाकायला आवडतो. त्यामुळे वेगळी चव येते. त्यात मी कांदा, टोमॅटोही टाकते. बाबांचं असं म्हणणं आहे की, मी खिचडी कमाल करते. त्यामुळे मी बाबांसाठी प्रेमाने खिचडी बनवते.

आपली प्रतिक्रिया द्या