
सामना प्रतिनिधी । ठाणे
नवरात्र संपताच सर्वत्र चाहूल लागली आहे ती तेजोमय दिवाळीची. दिवाळी म्हटली की रंगीबेरंगी आकाशकंदील हवाच. गेल्या काही वर्षांपासून चायनीज आकाशकंदिलांची चलती होती. यंदा मात्र ठाणेकरांच्या घरांवर मातीचे आकाशकंदील झळकणार आहेत. दिवाळीचे इको फ्रेंडलीपण जपण्यासाठी जांभळी नाक्याच्या बाजारपेठेत हे अनोखे आकाशकंदील दाखल झाले असून त्यास मोठी मागणी आहे.
वासीम देवरिया या व्यापाऱ्याने अहमदाबाद व कोलकाता येथून हे मातीचे आकाशकंदील ठाण्यात आणले आहेत. अर्धा फूट उंचीचे हे कंदील असून आकर्षक आकारांमुळे त्याचे देखणेपण वाढले आहे. फक्त 120 रुपयांमध्ये हे कंदील मिळत असल्याने अनेकांनी मातीचे कंदील लावण्याचा निर्णय घेतला आहे. मातीच्या पणत्या ही पिढ्यानपिढ्यांची परंपरा होती. मात्र दिवाळीच्या झगमगाटात चायना मार्केटने प्रवेश केल्याने ही परंपरा नष्ट होते की काय याची भीती होती.
गेल्या काही वर्षांपासून मातीच्या पणत्या बनवण्याचे प्रमाणदेखील कमी झाले असून त्याची जागा मेणाच्या पणत्यांनी घेतली आहे. एकीकडे हे मातीपण नष्ट होत असतानाच आता मातीच्या आकाशकंदिलाने यंदा भाव खाल्ला असून ठाणेकरांनी त्यास पसंती दिली आहे. एक फूट आकाराचेदेखील मातीचे आकाशकंदील लवकरच आणणार असल्याचे वासीम देवरिया यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.
घर पणत्यांचे
दिवाळीत आकाशकंदिलांबरोबरच पणत्याही अतिशय महत्त्वाच्या असतात. यंदा घरांच्या आकाराच्या पणत्या विक्रीसाठी आल्या असून आकर्षक रंगसंगतीमुळे त्यास मागणी वाढली आहे. गणपती, लक्ष्मी, घट आणि पणत्या याचा सेटदेखील मिळत असून ते सर्व मातीचे बनवले आहे. यंदाची ठाणेकरांची दिवाळी वैशिष्टय़पूर्ण पणत्या आणि मातीच्या कंदिलांनी लखलखणार आहे.





























































