प्लॅस्टिकपासून इको फ्रेंडली उत्पादने

>> अश्विन बापट (लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)

तापमान वाढ, प्रदूषण, निसर्गाचा समतोल बिघडणे यांसारख्या प्रश्नांनी तुम्ही आम्ही सारेच त्रस्त आहोत. अशा सगळय़ा आव्हानात्मक स्थितीत काही मंडळी पर्यावरण रक्षणासाठी, वातावरणाचा बिघडलेला समतोल साधण्यासाठी वेगळी वाट निवडतात. बडोदास्थित अंजली तांबे आणि त्यांच्या भगिनी शिल्पा कुलकर्णी यांचा प्रवासही असाच.

या वेगळय़ा वाटेबद्दल अंजली म्हणाल्या, मी इलेक्ट्रिकल इंजिनीअर. मला कलांची आवड. 2017 ची ही गोष्ट आहे. काहीतरी वेगळे करण्यासाठी डिझाइन सर्च करत असताना मला एक वेबसाइटवर ‘लव्ह यूअर ट्रश’ असा मेसेज दिसला आणि तो माझ्यासाठी कलाटणी देणारा क्षण ठरला. मग निसर्गाला हानी पोहोचवणाऱया प्लॅस्टिकपासूनच क्रिएटिव्ह, त्याच वेळी उपयुक्त वस्तू साकारावी असे मनात आले. माझा मुलगा डिझाइन ग्रॅज्युएट असल्याने त्याची मदत झाली.

प्लॅस्टिक हातमागावर विणले तर अधिक चांगले होईल, असा विचार मनात आल्यावर मग मी त्यादृष्टीने पावले टाकली. त्यात माझ्या दिराचीही मला मोलाची मदत झाली. तो टेक्सटाइल इंजिनीअर आहे. कोविड काळानंतर सारी गणिते बदलली तेव्हा त्याने हातमाग विणणाऱया स्थानिक कामगारांना एकत्र करून त्यांच्यासाठी खादी युनिट सुरू केले. प्लॅस्टिकही विणून घेतले तर चांगले होईल, असा विचार त्याने बोलून दाखवला. हादेखील माझ्या या व्यवसायात अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला.

एक मात्र नक्की की, प्लॅस्टिक विणणे तितके सोपे नाही. दोऱयाला ताकद असते, प्लॅस्टिकला ती नसते. त्यामुळे ते विणणे हे काwशल्याचे, जिकिरीचे आहे. ही गोष्ट 2020 ची. अंजली यांनी इंडस्ट्री वेस्ट प्लॅस्टिकच्या एजंटकडून प्लॅस्टिक मिळवून व्यवसायाला सुरुवात केली. इंडस्ट्री वेस्ट प्लॅस्टिक मिळवणे, ते धुवून सूर्यप्रकाशात सुकवणे, स्वच्छ प्लॅस्टिकच्या पट्टय़ा कापणे, या पट्टय़ांची एक प्लॅस्टिक शीट तयार करण्यासाठी हातमागावर विणणे, असा उत्पादनांचा प्रवास होत असतो.

अंजली सांगतात, बहीण शिल्पा आणि मी या कामासाठी ट्रेन केलेल्या तीन महिला कामगारांसह मग माझे ‘री डू’ हे वर्कशॉप बडोद्यात सुरू झाले. पहिले उत्पादन पिशवी होती. नंतर लाँड्री बॅग्ज, पाऊचेस, टेबल मॅट्स, चष्म्याची कव्हर्स, वॉलेट बनवले.

30 उत्पादने बाजारात

सध्या 30 उत्पादने आहेत, तसेच दर तीन महिन्यांनी किमान दोन नवीन उत्पादने यायला हवीत, असा अंजली आणि शिल्पा यांचा ध्यास असतो. कोणतेही उत्पादन विक्रीला आणण्याआधी त्या स्वतः ते वापरून पाहतात. रफ यूज करून पाहतात. जेणेकरून त्या वस्तूच्या दर्जाची खरी परीक्षा होईल. मगच ते उत्पादन विक्रीसाठी वर्कशॉप किंवा मग प्रदर्शनामध्ये ठेवले जाते.