इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या नावाने अर्थशास्त्रातील संशोधन संस्था उभारा, जनता दल सेक्युलर पक्षाची मागणी

शिवाजी पार्क येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. त्यांच्या या भूमिकेचे  जनता दल सेक्युलर पक्षाने स्वागत केले आहे. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या धर्तीवर अर्थशास्त्राचे शिक्षण देणारी जागतिक दर्जाची संस्था उभी करावी, अशी मागणी जनता दलाने केली आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी, इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारण्या ऐवजी तो पैसा कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी वापरावा, असे म्हटले आहे. मात्र, इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक व्हायलाच हवे, मात्र, ते केवळ पुतळ्याच्या स्वरुपात नको. कारण कितीही उंचीचा पुतळा केला तरी बाबासाहेबांच्या कीर्तीची तो बरोबरी करू शकणार नाही असे जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, राष्ट्रीय महासचिक निवृत्त न्या. बी जी कोळसे पाटील, महासचिव प्रताप होगाडे आणि प्रवक्ते प्रभाकर नारकर प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या