
वयोवृद्ध व्यावसायिकाची 60 कोटी 48 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून या दोघांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. एका खासगी कंपनीचे संचालक असलेल्या तक्रारदार वयोवृद्धाची राजेश आर्या या व्यक्तीमार्फत शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्याशी ओळख झाली होती. यावेळी त्यांनी बेस्ट डिल या गृहखरेदी आणि ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्मचे संचालक असल्याचे सांगून त्यांच्याकडे 75 कोटींच्या कर्जाची मागणी केली होती. नंतर त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी त्यांच्या कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी गुंतवणूक केली होती. पैशाचा अपहार झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जुहू पोलिसांत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.