विमुक्ता; तिच्या हाती जगाची ‘आर्थिक’दोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. ज्योती धर्माधिकारी

स्त्रीच्या हाती कुटुंबाची दोरी असते, त्याच स्त्रीच्या हाती जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था येते तेव्हा सर्वात छोटय़ा आणि सर्वात दुर्लक्षित देशाकडेही ती ममतेने बघते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या जागतिक महत्त्वाच्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा घेतल्यावर या म्हणण्यातील सत्यता पटते. क्रिस्टालिना या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे हे पद भूषविणाऱया दुसऱया महिला आहेत.

क्रिस्टिन लॅगार्ड यांच्या राजीनाम्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे संचालकपद समर्थपणे सांभाळू शकतील अशा अर्थतज्ञ आणि आंतरराष्ट्रीय अनुभव आणि समज असलेल्या त्या एकमेव व्यक्ती होत्या. 1 सप्टेंबर 2019 रोजी या प्रतिभावंत स्त्रीने संचालक पदाची सूत्रे सांभाळली. अत्यंत धोरणात्मक निर्णय घेणाऱया, आंतरराष्ट्रीय व्यापार कराराची माहिती असणाऱया क्रिस्टालिना यांनी त्या पदाला पूर्ण न्याय दिला. मात्र क्रिस्टालिना यांच्यापुढे सगळ्यात मोठे आव्हान होते ते कोव्हिड-19चे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची सूत्रे स्वीकारल्यानंतर दोनच महिन्यांनी संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने झाला. जागतिक व्यवहार थांबले. काही आशियाई देशांचा विकास दर तर शून्यावर येऊन थांबला. त्यातले त्यात जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश चीनने लॉकडाऊन केल्यानंतर एकूणच विकासाचा दर कमी झाला. त्यावेळी हा दर 3.6 वर स्थिर झाला होता. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अटीतटीच्या काळात या अर्थतज्ञ स्त्रीने मोठय़ा हिकमतीने जगाला संकटातून वाचवले.

‘विमुक्ता’ या सदरासाठी आणखी एका प्रभावी स्त्रीचा शोध घेत असतानाच दोन महत्त्वाच्या घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर घडल्या. गेल्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी संपूर्ण जगाला आर्थिक आणि राजकीय विखंडनाचा इशारा दिला. श्रीलंकेची आर्थिक विपन्नावस्था याच इशाऱयाची नांदी असावी की काय असे वाटते. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार, व्यापार, कर्ज पुरवठा, आर्थिक आणि राजकीय स्थिरता यांच्या बाबतीमध्ये महत्त्वाची संस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालक पदावर बल्गेरियन क्रिस्टालिना जॉर्जिव्हा या विराजमान आहेत. त्यांनीच संपूर्ण जगाला आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या धोक्याचा इशारा आता दिला आहे. क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी आपला अनुभव आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचे ज्ञान पणाला लावत या पदावर आपला हक्क सिद्ध केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे हे पद भूषविणाऱया या दुसऱया महिला आहेत. यापूर्वी हे पद क्रिस्टिन लॅगार्ड यांनी भूषविलेले आहे. क्रिस्टिन लॅगार्ड यांच्याकडूनच त्यांनी पदभार स्वीकारला.

क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांचा जन्म सोफिया, बल्गेरिया येथे 1953 मध्ये झाला. त्यांचे वडील रस्ते बांधकाम प्रकल्पांवर काम करणारे सिव्हिल इंजिनीअर होते, तर आजोबा इव्हान कार्शोव्ह्स्की बल्गेरियन क्रांतिकारी होते. त्यांचा विवाह किनो किनोव्ह यांच्याशी झाला असून त्यांना एक मुलगा आहे. सध्या त्या कुटुंबासह वॉशिंग्टन येथे राहतात. क्रिस्टालिना यांनी अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रया विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण राष्ट्रीय आणि जागतिक अर्थ विद्यापीठ, सोफिया येथून 1976 मध्ये पूर्ण केले, याच संस्थेतून पुढे त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. ‘अमेरिकेचा आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण धोरण’ हा प्रबंध त्यांनी सादर केला होता. एकूणच क्रिस्टालिना अर्थव्यवस्थेचा पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर होणाऱया परिणामांबाबत अत्यंत जागरूक आहेत. त्यांची पर्यावरणीय भूमिका वेळोवेळी स्पष्ट झालेली दिसते. क्रिस्टालिना या खरे तर शिक्षणतज्ञ, प्रोफेसर म्हणून ख्यातीप्राप्त आहेत. अनेक विद्यापीठांमध्ये त्या पाहुण्या प्राध्यापक म्हणून जात असत, तसेच बल्गेरियन सरकारने अनेक महत्त्वाच्या खात्यांच्या सल्लागारपदी त्यांची नियुक्ती केलेली होती.

1993 मध्ये क्रिस्टालिना जागतिक बँकेमध्ये ‘युरोप आणि मध्य-आशियाच्या पर्यावरण विभागा’च्या संचालक म्हणून रुजू झाल्या. प्रदीर्घ काळ जागतिक बँकेत काम केल्यानंतर त्या बँकेच्या भागधारक, प्रातिनिधिक संचालकसुद्धा होत्या. 2010 मध्ये निवृत्ती स्वीकारली तेव्हा त्या जागतिक बँकेच्या उपसंचालक पदापर्यंत पोहोचल्या होत्या.

युरोपियन आयोगाच्या आयुक्तपदासाठी त्यांनी बँकेच्या नोकरीला रामराम ठोकला. क्रिस्टालिना यांनी 9 फेब्रुवारी 2010 ला आयोगाच्या आयुक्त म्हणून आपली कारकीर्द सुरू केली तेव्हा त्यांना हैती या कॅरेबियन देशाबद्दल विशेष सहानुभूती वाटत होती. तेथील लोकांना निवारा आणि आरोग्य सेवा पुरवण्याकडे त्यांचे लक्ष होते. 2019 पर्यंत त्यांनी युरोपियन आयोगाच्या विविध प्रभागांच्या संचालक आणि राजदूत म्हणून काम पहिले.

क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी कोविड काळात हिंदुस्थानबद्दल बांधलेले आर्थिक आडाखे चुकले होते. हिंदुस्थानचा विकास दर शून्यावर किंवा आसपास राहील असे मत त्यांनी नोंदवले होते. मात्र, हिंदुस्थानचा दर हा चार टक्क्यांच्या जवळपास स्थिर राहिला. आजघडीला हिंदुस्थानचा विकास दर 8 ते 8.6 टक्के असा प्रगतीपथावर आहे. याच पार्श्वभूमीवर वर उल्लेख केलेल्या दोन महत्त्वाच्या घटनांपैकी दुसरी घटना म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटी त्यांनी निर्मला सीतारामन या हिंदुस्थानच्या वित्तमंत्री यांची भेट घेतली. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने दाखवलेल्या आर्थिक स्थिरतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यंदाच्या निर्यात धोरणानुसार हिंदुस्थान सरकारने गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी समाज माध्यमांवर हिंदुस्थानने आपली भूमिका मागे घ्यावी आणि गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवावेत अशी विनंती केली आहे. संपूर्ण जगाच्या अन्नधान्याच्या पुरवठय़ावर नियंत्रण असणाऱया आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालकांना हिंदुस्थानी निर्यात महत्त्वाची वाटते हे विशेष! त्यांच्या मते गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले गेले नाही तर जगभरातील अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येईल.

या मार्चमध्ये चीनने शून्य-कोविड अभियानांतर्गत देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन निर्बंध लागू केले. त्यामुळे ‘‘एकूण विकास दराची घसरगुंडी किंवा युक्रेनच्या लढाईमुळे आर्थिक स्थिरता धोक्यात येणार याची फारशी काळजी आपल्याला वाटत नाही’’, असे क्रिस्टालिना म्हणतात. मात्र, आर्थिक आणि राजकीय विखंडनाचा एक नवा प्रघात यामुळे रूढ होतो होतो की काय? अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

स्त्रीच्या हाती कुटुंबाची दोरी असते, त्याच स्त्रीच्या हाती जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था येते तेव्हा सर्वात छोटय़ा आणि सर्वात दुर्लक्षित देशाकडेही ती ममतेने बघते. पृथ्वीतलावरची एकही व्यक्ती उपाशी किंवा उपेक्षित राहणार नाही ही जबाबदारी ती मानते आणि देशांचे आर्थिक तसेच राजकीय स्वातंत्र्य अधोरेखित करते. क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांचे कार्य जगातील प्रत्येक देशाचा सन्मान करते हे विशेष.
[email protected]

(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागाच्या प्रमुख आहेत.)