ED कडून मनी लाँड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

robert-vadra

युकेमधील शस्त्र विक्रेता संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती असलेल्या रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणावर न्यायालय ६ डिसेंबर रोजी सुनावणी करणार आहे.

या वर्षी जुलैमध्ये, युके येथील शस्त्र विक्रेता संजय भंडारी यांच्या मालकीच्या लंडनमधील १९, ब्रायनस्टन स्क्वेअर, ग्रोसव्हेनर हिल कोर्ट, आणि १३ बॉर्डन स्ट्रीट येथील दोन मालमत्तांशी संबंधित या प्रकरणात एजन्सीने वाड्रा यांची पाच तास चौकशी केली होती. या मालमत्ता वाड्रा यांच्या बेनामी मालमत्ता असल्याचा युक्तिवाद ईडीने केला आहे.

संजय भंडारी (६१), जो फरारी शस्त्र विक्रेता आहे, त्याच्यावर विदेशी चलन कायद्यांचे उल्लंघन करण्यापासून ते शासकीय गुप्तता कायद्याचे उल्लंघन करण्यापर्यंत विविध गुन्ह्यांसाठी ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि दिल्ली पोलीस यासह अनेक यंत्रणांकडून तपास सुरू आहे. हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी भंडारीला प्रत्यार्पित करण्यासाठी दोन विनंत्या पाठवल्या होत्या.

युकेमध्ये अटक होऊनही, हिंदुस्थानच्या तुरुंगांमध्ये गैरवर्तन होण्याची संभाव्य शक्यता असल्याचे कारण देत युके उच्च न्यायालयाच्या किंग्ज बेंचर्स विभागाने या वर्षाच्या सुरुवातीला त्याचे प्रत्यार्पण थांबवले होते.