Video : राज ठाकरेंना ईडीने बजावलेल्या नोटीसवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

2033

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून बजावण्यात आलेल्या नोटीसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, ‘तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढीच माहिती मलाही आहे. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांद्वारे नोटीसबाबत कळाले. ती कशासाठी आली आहे हे मला माहिती नाही.’

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘ईडीचा आणि आमचा संबंध नाही. ईडी ही स्वतंत्रपणे काम करणारी संस्था आहे. नोटीस आली असेल तर त्याला उत्तर द्यायला हवे. चूक नसेल तर घाबरण्याची आवश्यकता नाही.’ तसेच ‘याला सुडबुद्धी म्हणू नका. ईडीच्या अनेक चौकशा सुरू असतात. चौकशीत एखाद्याचे नाव आले, एखाद्या व्यवहाराचा संबंध दिसल्यास नोटीस पाठवली जाते. ईडीचा दावा योग्य असेल तर कारवाई करतात, नसेल तर सोडून देतात’, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या नोटीसचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याआधी राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस बजावण्यात आली. 22 ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

संपूर्ण पत्रकार परिषद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

आपली प्रतिक्रिया द्या