20 लाख खंडणीसह ईडी अधिकाऱयाला अटक, तपास थांबवण्यासाठी ब्लॅकमेलिंग

खोटय़ा केसेसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून राजस्थानात भरमसाट पैसे उकळणाऱया ईडी अधिकाऱयाला काही दिवसांपूर्वी अटक झालेली असतानाच आता ईडीचे प्रलंबित प्रकरण रफादफा करण्यासाठी एका ईडी अधिकाऱयाला तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अंकित तिवारी असे अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱयाचे नाव आहे. तामीळनाडूतील मदुराई येथे ही कारवाई करण्यात आली. ईडी अधिकाऱयाच्या कारमध्ये 20 लाख रुपये कॅश, ईडीचे आयडी कार्ड पोलिसांना आढळून आले. हा अधिकारी गेल्या पाच वर्षांपासून सक्तवसुली संचालनालयात कार्यरत आहे.

दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय (डीव्हीएसी) च्या माहितीनुसार, ईडी अधिकारी अंकित तिवारी महाराष्ट्रातील नोंदणी झालेल्या कारमधून 20 लाख रुपयांची रोकड घेऊन जात होता. दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय पथकातील पोलीस अधीक्षक सरवनन यांनी ईडी अधिकारी अंकित तिवारी याच्याकडे या पैशासंबंधी विचारणा केली असता हे पैसे लाच घेतल्याचे आहेत, असे तो म्हणाला. तपास पथक चेट्टिनाकेनपट्टी जवळ एका वाहनाची तपासणी करीत असताना नागपूरमधील एका व्यक्तीला घेऊन जात असलेल्या कारची तपासणी करण्यात आली. त्यावेळी या कारमध्ये 20 लाखांची पॅश आढळून आली. पोलिसांनी या ईडी अधिकाऱयाला अटक केली असून कार, आयकार्ड आणि पैसे जप्त केले आहेत.

– ईडी कार्यालयात अधिकारी म्हणून असलेल्या अंकित तिवारीची चार महिन्यांपूर्वीच नागपूर विभागातून तामीळनाडूमधील मदुराई विभागात बदली झाली. डिंडीगुल येथील एका डॉक्टरविरोधात ईडीचा तपास सुरू होता. ईडीचा प्रलंबित तपास बंद करण्यासाठी अंकित तिवारी याने डॉक्टरकडे 20 लाखांची खंडणी मागितली. पैसे दिल्यास हे प्रकरण कायमचे बंद करू, असे अंकित तिवारी याने सांगितले.

– अंकित तिवारीकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने याला पंटाळून डॉक्टरने दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्या आधारे सापळा रचून दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱयाने ईडी अधिकारी अंकित तिवारीला अटक केली. अंकित सोबत आणखी ईडी अधिकारी सहभागी आहेत का?, याचा तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.