राज ठाकरे यांची साडेआठ तास ईडीकडून चौकशी

1110

कोहिनूर मिल खरेदी व्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) गुरुवारी साडेआठ तास चौकशी केली. या चौकशीमध्ये राज ठाकरे यांनी ईडीच्या अधिकाऱयांना समाधानकारक उत्तरे दिल्याचे समजते.

दादर येथील कोहिनूर मिल क्रमांक तीनच्या खरेदी व्यवहारप्रकरणी चौकशी करण्यासाठी सक्त वसुली संचालनालयाने राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार राज ठाकरे सकाळी साडेअकरा वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडीच्या अधिकाऱयांनी त्यांची चौकशी केली. रात्री सव्वाआठच्या सुमारास राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. दिवसभर झालेल्या चौकशीत त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना दुसऱया दिवशी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार नाही असे समजते.

राज यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, मुलगा अमित, सून मिताली असा परिवार तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. राज ठाकरे यांना एकटय़ाला ईडी ऑफिसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर ईडीच्या कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान राज ठाकरे यांच्या चौकशीच्या निमित्ताने मुंबईसह राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिवसभर ताब्यात घेऊन ठेवले होते.

कितीही चौकशा केल्या तरी मी बोलतच राहणार
माझ तोंड कुणीही बंद करू शकत नाही. कितीही चौकशा केल्या तरी मी बोलतच राहणार आणि काम करत राहीन. माझ तोंड बंद होणार नाही, अशी मोजकीच प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या