व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांच्या घर व कार्यालयावर छापे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पंटर इक्बाल मिर्ची मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने आज व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांच्या घर व कार्यालयावर छापे मारले. या कारवाईत ईडीच्या हाती काय लागले ते मात्र समजू शकले नाही. काही दिवसांपूर्वी डीएचएफएलचे व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवन यांना ईडीने बेडय़ा ठोकल्या होत्या.

सुधाकर शेट्टी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे मुंबईत विविध ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत. शिवाय त्यांनी काही वर्षांपूर्वी एक मराठी वृत्तवाहिनीदेखील सुरू केली होती. ते खासगी चार्टर्ड विमान सेवादेखील पुरवितात. डॉन दाऊद इब्राहिमचा पैसा इक्बाल मिर्ची याने हिंदुस्थानात मालमत्ता खरेदीसाठी वापरला असल्याचा ईडीला संशय आहे. इक्बाल मिर्चीशी संबंधित बनावट कंपन्यांना 2100 कोटींचे कर्ज दिल्याच्या आरोपावरून ईडीने एचडीएफएलचे कपिल वाधवान यांना अटक केली. एचडीएफएलने मिर्चीशी संबंधित 2100 कोटी रुपयांच्या कर्जाद्वारे बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचाही ईडीला संशय आहे. त्यामुळे यासंबंधी मनी लॉण्डरिंग कायद्यांतर्गत ईडी त्याचा तपास करीत आहे. दरम्यान, वाधवान यांच्या चौकशीनंतर आज सुधाकर शेट्टी यांच्या घर व कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. शेट्टी यांचाही मिर्चीशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात सहभाग असावा असा ईडीचा संशय आहे.