मिंध्यांचे नगरविकास खाते ईडीच्या रडारवर, वसईच्या आयुक्ताने लुटलेल्या एक हजार कोटींचे वाटेकरी कोण?

वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सोडताच ईडीचे छापे पडलेले अनिलकुमार पवार यांनी तब्बल एक हजारहून अधिक कोटींचा घोटाळा केल्याचा संशय असून या तपासाची चक्रे ईडीने वेगात फिरवली आहेत. शहासेनेचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई असलेले अनिलकुमार पवार यांनी हा सगळा कारनामा नगरविकास खात्याच्या कृपेनेच केल्याचे बोलले जात आहे. पवार यांनी गोळा केलेला काळा पैसा ठाण्यात कोणाकडे पोहचला, नगरविकास विभागाच्या कोणत्या अधिकाऱयाने त्यांच्याकडून हप्ते घेतले, पवार यांनी लुटलेल्या पैशाला कुठे पाय फुटले, या लुटीचे मंत्र्यांचे लाभार्थी कोण याचा तपास ईडी करण्याची शक्यता असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे नगरविकास खाते ईडी चौकशीच्या रडारवर आले आहे.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात डंपिंग ग्राऊंडवर भूमाफियांनी उभारलेल्या 41 बेकायदा इमारती कोर्टाच्या आदेशाने पाडण्यात आले असून याप्रकरणात पवार गोत्यात आले आहेत. ईडीने पवार यांच्या वसई, ठाणे, नाशिक, पुण्यातील ठावठिकाण्यांवर धाडी घातल्या असून पवार यांच्या भ्रष्टाचाराची पुंडलीच समाजमाध्यमांतून समोर आली आहे.

पवार यांच्या कार्यकाळात भूमाफियांनी बेकायदा टॉवर उभारले. त्यांना बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. भोगवटा प्रमाणपत्रे व टीडीआर प्रमाणपत्रांमधूनही कोटय़वधींची माया गोळा करण्यात आली. अतिक्रमणे, आरक्षित भूखंडांवरील बेकायदा बांधकामे, नळजोडण्या, ठेकेदारी, यंत्रसामुग्री खरेदी, सफाईचे ठेके यातून पवार यांनी केलेल्या घोटाळ्याचा आकडा एक हजार कोटींवर गेल्याचा दावा करणारा तपशील समाजमाध्यमांतून व्हायरल झाला आहे.

काळा पैसा कोणाकडे पोहचला?

नगरविकास विभागाने पावलापावलावर पवार यांना आणि त्याच्या भ्रष्ट कारभाराला संरक्षण दिले. पवार यांनी गोळा केलेला काळा पैसा ठाण्यात कोणाकडे पोहचला? नगरविकास विभागातील कोणत्या अधिकाऱयाने त्यांच्याकडून हप्ते घेतले? त्याने लुटलेला पैसा कुठे गेला, त्या पैशाला कुठे पाय फुटले? नगरविकास विभागाचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील कोणत्या माणसाने या वसुलीचा लाभ घेतला, एकनाथ शिंदे यांची पवार यांच्या भ्रष्ट कार्यपद्धतीबद्दल नेमकी भूमिका काय, असे असंख्य प्रश्न वसईतील करदाते आणि पीडित नागरिक विचारत आहेत. तोडलेल्या 41 इमारतींच्या भंगारातून अनिलकुमार पवार यांनी किमान 10 कोटी रुपये मिळवल्याचा दावाही कारवाईनंतर ज्यांचे संसार रस्त्यावर आले अशा कुटुंबांनी केला आहे.

ठाकूर कनेक्शन?

पवार यांचा जंगी निरोप समारंभ झाला. त्या समारंभाला माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर उपस्थित होते. पवार वसईत आयुक्त म्हणून आले तेव्हा ठाकूर समूह आणि पवार यांच्यात खटके उडाले होते, मात्र नंतर संबंध सुधारले. त्याचा ठाकूर समूहातील कुणाला लाभ मिळाला, सीसी, ओसीच्या बदल्यात कोणत्या ट्रस्टच्या नावाने धनादेश निघाले, असे प्रश्न विचारले जात असून नारायण मानकर आणि जितू शहा यांचीही नावे यात समाजमाध्यमातून घेतली जात आहेत.

कुणावरच कारवाई नाही

41 बेकायदेशीर इमारती कोर्टाच्या आदेशाने तोडण्यात आल्या. मात्र, या बेकायदा इमारती ज्यांच्या आशीर्वादाने उभ्या राहिल्या त्या कुणावरच कारवाई करण्यात आली नाही. इमारती पाडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च झाला. तोही कुणाकडून वसूल करण्यात आला नाही.

थेट ठाण्यातून आदेश कोणाचे?

अनिलकुमार पवार हे एकनाथ शिंदे यांच्या कृपेमुळे वसई-विरार महापालिकेत आयुक्तपदाच्या खुर्चीवर बसले. पवार महापालिकेत प्रशासनप्रमुख म्हणून कार्यरत होताच वसई-विरारमध्ये बेकायदा बांधकामांचे पेव फुटले. त्यांना थेट ठाण्यातून आदेश येऊ लागले आणि बेकायदा बांधकामे पह्फावली. वनजमीन, महसूल जमीन, कांदळवने, वेटलॅण्ड, शासकीय गुरचरण आणि आदिवासी जमिनी भूमाफियांच्या घशात गेल्या. ठाण्यातून त्यांना आदेश कोणी दिले याचा तपासही ईडी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

ईडीने चावी बनवून घेतली, टाळे उघडले घरात 17 तास झडती, 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त.

ईडीने पवार यांना नोटीस जारी केली असून पुढील आठवडय़ात मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर होण्याचे फर्मान दिले आहे.

धाडसत्रानंतर वसईत फटाके फुटले