उमेद – ‘ईडार्च’चा दिलासादायक पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ममता क्षेमकल्याणी

कोविड-19च्या महासाथीने निर्माण केलेल्या अनेक प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचे काम समाजातील अनेक घटक आज आपापल्या पातळीवर करत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ‘ईडार्च’ या संस्थेने एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून घेतलेला पुढाकार निश्चितच दिलासादायक आहे.

कोविड-19च्या महासाथीने अखिल मानव जातीला आपल्या मगरमिठीत घट्ट पकडून ठेवले आहे. या परिस्थितीतून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग विविध प्रयत्नांमधून शोधला जात आहे. या कठीण परिस्थितीत केवळ आरोग्याच्या बाबतीत नव्हे तर इतर अनेक स्तरांवर म्हणजे मानसिक, भावनिक, आर्थिक, शैक्षणिक अशा आपल्या जगण्याच्या अनेक अंगांवर या महासाथीचा मोठा परिणाम झालेला दिसून येतो आहे.

या काळात अनेक व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेऊन आपापल्या परीने अनेक पातळ्यांवर मदतीचे हात पुढे केले आहेत. कोविड-19मुळे समाजातील अनेक घटकांचे खूप मोठे नुकसान झाले असून ते भरून काढण्याचे आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे. याचाच एक भाग म्हणून अपंग व्यक्तींना रोजगाराचा पर्याय उपलब्ध करून देत त्यांचे खऱया अर्थाने पुनर्वसन करणाऱया ‘ईडार्च’ अर्थात अंथ्रप्रेन्यूअरशिप डेव्हलपमेंट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर द हँडीकॅप्ड या संस्थेने कोविड-19च्या पार्श्वभूमीवर एक प्रकल्प हाती घेतला आहे.

दिव्यांग व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि बेघर, गरीब, निराधार, विधवा, परित्यक्ता महिला आणि एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांच्या जीवनात कोविड-19मुळे सर्वाधिक प्रश्न निर्माण केले आहेत, या जाणिवेतून ‘ईडार्च’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे यांनी या घटकांच्या पुनर्वसनासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोविड-19मुळे दुर्दैवाने अनाथ झालेल्या मुलांचे संगोपनदेखील या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे. पुण्यापासून जवळच असलेल्या गावात हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस आहे. जे दिव्यांग शिक्षण घेऊ शकले नाहीत किंवा त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झालेली नाही, परिस्थिती किंवा बौद्धिक क्षमता या कारणांमुळे ज्यांना शिक्षणाचे दार खुले होऊ शकले नाही, अशा दिव्यांगासाठी पुण्यातील ईडार्च अर्थात अंथ्रप्रेन्यूअरशिप डेव्हलपमेंट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर द हँडीकॅप्ड ही संस्था कार्य करीत आहे…

केवळ एखाद्या शारीरिक किंवा मानसिक अपंगत्वामुळे ज्यांच्या संपूर्ण आयुष्याला एक प्रकारची खीळ बसली आहे आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम त्यांच्यासह त्यांच्या सगळ्या कुटुंबावर होतात, अशा व्यक्तींच्या आयुष्यांना नवसंजीवनी देण्याचे काम ‘ईडार्च’ करीत आहे. बहुविकलांग, परावलंबी मुले आणि त्यांचे पालक यांची परिस्थिती तर करोनाच्या काळात अत्यंत बिकट झालेली आहे. ईडार्चचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे यांच्या पुढाकाराने पुण्यापासून जवळ उपलब्ध जागेवर बहुविकलांग मुलांसाठी कॉटेजेस बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक कॉटेजमध्ये एका बहुविकलांग मुलाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्या मुलांची रोजची शुश्रूषा करण्यासाठी समाजातील निराधार, परितक्त्या किंवा एकटय़ा राहणाऱया गरजू महिलांची नेमणूक तिथे करण्यात येणार आहे. यामुळे ज्या महिलेला घर नाही, नोकरी मिळत नाही तिला स्वतःचे घर मिळेल अशी कल्पना आहे.

या सर्व महिलांना त्याच ठिकाणी एखादा व्यवसाय एकत्रितपणे सुरू करून देण्यात येणार आहे. या महिला बहुविकलांग मुलाची रोजची कामे आवरून झाल्यानंतर उरलेल्या वेळेत व्यावसायिक कामे करून अर्थार्जन करतील. या वेळेत बहुविकलांग व्यक्तीचा सांभाळ करण्यासाठी समाजातील आणखी एक घटक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना यात सहभागी करू घेतले जाणार आहे. आपल्याकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढतेच आहे. पण अजूनही वृद्धाश्रमात राहण्याबद्दल समाजात एक प्रकारची नकारात्मकता दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे वृद्धाश्रमात राहणारी ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या कुटुंबासाठी आणि पर्यायाने समाजासाठी निरुपयोगी असते, असा गैरसमज आपल्याकडे निर्माण झालेला दिसून येतो. या परिस्थितीचा विचार करून ‘ईडार्च’च्या आगामी प्रकल्पात बहुविकलांग व्यक्तीला मदत करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक एक उत्तम पर्याय निवडला जाणार आहे. कारण प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने त्याच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे काम केलेले असते. त्या कामाचा अनुभव या ज्येष्ठांच्या गाठीशी असतो. त्यांचे शिक्षण, त्यांचे छंद, कला, आवडीनिवडी, कौशल्ये या सगळ्याचा उत्तम वापर बहुविकलांग व्यक्तीच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण करण्यासाठी करण्यात येणार आहे. बहुविकलांग व्यक्तीला व्हील चेअरवर फिरवणे, त्यांना पुस्तके वाचून दाखवणे, गाणे म्हणून दाखवणे किंवा एखादे वाद्य वाजवून त्यांचे मनोरंजन करणे अशी सोपी पण महत्त्वाची कामे हे ज्येष्ठ नागरिक अगदी मनापासून करू शकतील. कारण कोणत्याही कारणामुळे वृद्धाश्रमात रहावे लागणाऱया ज्येष्ठांच्या मनातदेखील अनेकदा निराशेच्या भावना निर्माण होतात. अशा परिस्थितीत त्यांना आपला कोणाला तरी चांगला उपयोग होतो आहे, ही सकारत्मक भावना त्यांच्या मनात संपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून पेरता येईल. वृद्धाश्रमापेक्षा काहीसा वेगळा असा हा प्रकल्प उभारण्याचा संकल्प आहे.

या प्रकल्पात सर्व बहुविकलांग व परावलंबी आयुष्य जगणाऱया मुला-मुलींना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर कोविड-19मुळे पालकांचे छत्र गमावलेल्या अनाथ मुलांचे संगोपन केले जाणार आहे.

अशा प्रकारे बहुविकलांग मुले, निराधार एकटय़ा गरजू महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा तिन्ही घटकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून एकाच छताखाली आणून त्या सगळ्यांमध्ये भावनिक बंध निर्माण करून त्यांचा एकमेकांना आधार वाटेल, अशी व्यवस्था निर्माण करणे हे ‘ईडार्च’चं ध्येय असून त्यासाठी ‘ईडार्च’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे यांनी या संपूर्ण प्रकल्पाचा समायोजित आराखडा तयार केला आहे. तसेच या प्रकल्पाला भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याचा ‘ईडार्च’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे यांचा मानस असून अपंगांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात यासाठी या ठिकाणी विविध प्रकारचे कौशल्य विकास व प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वेगवेगळ्या कला, क्रीडा, तंत्रज्ञान, साहित्य, भाषा, जीवन कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, कॉर्पोरेट ट्रेनिंग, बँकिंग, स्पर्धा परीक्षा यासह अन्य प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षित दिव्यांग मुलांना वरील क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करून त्याचा पाठपुरावादेखील केला जाणार आहे. येथे प्रशिक्षण देण्यात आलेल्या मुलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रांतील स्पर्धा, उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी करण्यात आले.

दिलीप देशपांडे हे चार्टर्ड इंजिनीयर असून त्यांना अमेरिकन विद्यापीठाची ‘कौशल्य विकास व अंथ्रप्रेन्यूअरशिप डेव्हलपमेंट’मध्ये डॉक्टरेट मिळाली आहे. दिव्यांगांसाठी करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांना पंतप्रधानांकडून राष्ट्रीय पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा डॉ. दिलीप देशपांडे यांचा मानस आहे.

कोविड-19ने अनेकांची जवळची माणसे हिरावून घेतल्याने त्यांच्या जीवनात प्रश्नचिन्हांची मालिकाच निर्माण झाली आहे. कोविड-19ने माणसामाणसातील अंतर वाढवले असले तरी मनाने दूर न जाता माणुसकीचा ठेवा जपणारा हा प्रकल्प पुढच्या पिढीला खंबीरपणे उभे राहण्यासाठी निश्चितच बळ देणारा ठरेल. या प्रकल्पाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क – डॉ. दिलीप देशपांडे – 9823082671

[email protected]