
राज्यातल्या 6 हजार 964 शाळांमध्ये मुलींसाठी आणि 10 हजार 189 शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.
राज्यातील शाळांमध्ये मूलभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत हारुन खान, प्रदीप जैस्वाल यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युडायस प्लस 2024-25 या अहवालानुसार राज्यातील 25 हजार 958 शाळांमध्ये संगणक सुविधा, तर 30 हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधा, तसेच 5 हजार 577 शाळांमध्ये वीजपुरवठा नसल्याचे ऑक्टोबर 2025 मध्ये निदर्शनास आले हे खरे आहे काय? असा तारांकित प्रश्न होता. त्यावर हे अंशतः खरे असल्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

























































