
सामना प्रतिनिधी । नवी मुंबई
सुशिक्षित वाहन चालकांपेक्षा कमी शिकलेले वाहन चालकही चांगले वाहन चालवितात. म्हणूनच वाहन चालकाच्या परवान्यातून शिक्षणाची अट काढण्यात आली आहे. त्याचा फायदा दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या नागरिकांना होणार असून देशात कमतरता असलेल्या 25 लाख चालकांची उणीव भरून निघणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
हिंदुस्थान बस ऑपरेटर महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रवास-2019 या प्रदर्शनात गडकरी बोलत होते. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या धरतीवर मुंबई-दिल्ली हा एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार आहे. मात्र हा मार्ग इलेक्ट्रीक असणार आहे. त्यामुळे इंधनामध्ये मोठी बचत होणार असून हे अंतर बारा तासांमध्ये वाहनांना पार करता येणार आहे, असे गडकरी म्हणाले.
























































