
अहमदपूर तालुक्यातील सिंदगी येथे शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराला कंटाळून गटशिक्षण अधिकारी व केंद्रप्रमुखास शाळेत कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला आहे.
सिंदगी (बु) येथे मागील दोन वर्षांपासून नियुक्त असलेले इंग्रजी विषयाचे जिल्हा परिषदेच पदवीधर सहशिक्षक मारोती कदम शाळेत सतत गैरहजर असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा ही बाब शिक्षण विभाग अहमदपूर यांच्या निदर्शनास आणून दिली, परंतु गावकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासन वेळोवेळी दुर्लक्ष करत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराला कंटाळून केंद्रप्रमुख एम.एस. मिटकरी व मुख्याध्यापक के.एन. काचे यांना जिल्हा परिषद शाळेत कोंडून ठेवले. ही बाब गटशिक्षणाधिकारी बबन ढोकाडे यांना समजताच त्यांनी तिथे जाऊन ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी बबन ढोकाडे यांनाही शाळेत कोंडून ठेवले. जोपर्यंत कायमस्वरूपी इंग्रजी विषयाचा शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलुप उघडले जाणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे गटशिक्षणाधिकारी बबन ढोकाडे यांनी इंग्रजी विषयाचे पदवीधर सहशिक्षक प्रमोद यादव यांच्या नियुक्तीचे पत्र ग्रामस्थांना दिले. त्यानंतर दोन तासांनी गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना सोडण्यात आले.





























































