आठवडा बाजारावर वाढत्या उन्हाचा परिणाम; ग्रामीण भागातील अर्थचक्र कोलमडले

वाढत्या उष्णतेचा सोलापूर शहर व ग्रामीण भागातील आठवडा बाजारावर परिणाम झाला आहे. ग्राहकच नसल्याने ग्रामीण भागातील अर्थचक्र कोलमडले असून, याचा फटका उत्पादक व शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या सीमावर्ती भागातील ग्रामीण भागात अचानक तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट निर्माण झाल्याने महिला, लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, भाजीपाला विक्रेते हवालदिल झाले आहेत. सध्या सीमावर्ती परिसरातील तापमान 43 अंशांवर गेले आहे. या वाढत्या उष्णतेच्या प्रचंड लाटेला तोंड देताना नागरिक हैराण झाले आहेत. सतत दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या अक्कलकोट तालुक्यात सध्या एप्रिलच्या पहिल्याच आठवडय़ात उष्णतेची प्रचंड दाहकता जाणवत आहे. आगामी काळात तापमानात आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

कडक उन्हामुळे सीमावर्ती भागातील भीमा नदी परिसर वगळता इतर भागातील भाजीपाला करपू लागल्याचे चित्र दिसत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे. शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे.