प्रभावी पश्चिमोत्तानासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाठीच्या कण्याला ताण देणाऱया, पाठीचा कणा ताणणाऱया आसनामधील एक सर्वोत्कृष्ट आसन म्हणजे पश्चिमोत्तानासन.

सर्वप्रथम खाली जमिनीवरती बसावे. आपले पाय सरळ समोर सोडावेत. पाय जुळवून ठेवावेत. पाठीचा कणा शक्य तितका सरळ ताठ ठेवावा. शांतपणे दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. डोळे बंद करावेत. मन शांत ठेवून आपल्या श्वासोच्छ्वासावरती लक्ष केंद्रित करावेत. नंतर हात पर्वतासनाप्रमाणे वर उचलावेत आणि पाठीचा कणा आणखी जास्त खेचून ठेवावा. दीर्घ श्वास भरून शांतपणे ओंकाराचं उच्चारण करावं आणि त्यानंतर पाठीचा कणा कमरेत शक्य तितका सरळ ठेवून सावकाशपणे खाली वाकत आपल्या हातांनी आपल्या दोन्ही पायांचे अंगठे पकडावेत आणि आपले कपाळ हे आपल्या पायांच्या गुडघ्यांच्या थोडेसे पुढे आपल्या पायांना लावायचा प्रयत्न करावा. पुढे वाकताना आपले लक्ष आपल्या श्वासोच्छ्वासावर ठेवावे. शक्य तितके खाली वाकावे. त्या स्थितीमध्ये थोडा वेळ स्थिर रहावे. आपले शरीर आणि खांदे सहज सोडून द्यावेत. उच्छ्वासासह आणखी थोडे खाली वाकावे. जर आपले कपाळ पायांना लागत असेल तर हनुवटी लावायचा प्रयत्न करावा. हनुवटी लागल्यानंतर आपल्या हातांचे कोपरे हे गुडघ्याच्या बाजूला जमिनीला लावून ठेवावेत. मात्र हातांनी पायांचे अंगठे नीट धरून ठेवावेत. या आसनाला पश्चिमोत्तानासन असे म्हणतात.

आसनाचे लाभ

■ पश्चिमा म्हणजे पाठ. या आसनामध्ये पायाच्या मागच्या नसा, पाठीचा कणा, पाठीचे स्नायू, आपले खांदे आणि मान या शरीराच्या सर्व मागील भागांना किंवा पार्श्वभागाला चांगला ताण मिळतो आणि म्हणूनच या आसनाला पश्चिमोत्तानासन असे म्हटले आहे. या आसनाने शरीर चांगलेच लवचिक होते. लहान मुलांची उंची वाढविण्यास आसनामुळे सहाय्य होते. पश्चिमोत्तानासनामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा आपल्या पाठीच्या सर्व स्नायूंमधून सुसंचालित होते. वातामुळे कमरेमध्ये, पाठीमध्ये कस भरला असेल तर तो दूर होतो. पाठीच्या कण्याचे आणि स्नायूंचे संचालन उत्तम प्रकारे होते. भूक चांगली लागते आणि त्याच्यामुळे पचनही चांगल्या प्रकारे होते. पोट कमी होते. चपळता वाढते. त्यामुळे योगसाधक उत्साही राहतो.

■ हेच आसन जेव्हा आपण उभ्याने करतो तेव्हा त्याला हस्तपादासन असे म्हटले जाते आणि हेच आसन झोपून केल्यानंतर होते ते पूर्ण हलासन. या पूर्ण हलासनासंबंधी अधिक माहिती आपण पुढील लेखांमध्ये घेऊ.

■ कंबरदुखी, पाठदुखी असेल किंवा मानेचा त्रास असेल तर मात्र हे आसन टाळावे

n सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
www.bymyoga.in