पक पक पकाक…कोंबडीने खाल्ला भाव

715

झणझणीत चिकनचा रस्सा… चिकन मसाला… बटर चिकन… तंदुरी, लॉलिपॉप, टिक्का… रविवार म्हणजे अस्सल नॉनव्हेज खवय्यांसाठी तिखटाचा दिवस… बाप्पाला निरोप दिल्यानंतर नवरात्रीपर्यंत वाराला मस्त ताव मारण्याचा बेत… पण नेमके खाण्याचे दिवस आले तर कोंबडी भलताच भाव खाऊ लागली आहे. आतापर्यंत 110 रुपये किलोने मिळणारी बॉयलर 120 रुपये किलो तर 200 रुपयांची गावठी 220 रुपये किलोने चिकन शॉपवर विकली जात आहे. त्यामुळे खवय्यांनी हात आखडता घेतला असून अंडय़ावर जिभेचे चोचले भागवण्यास सुरुवात केली आहे.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पाकसाचे आफ्टर शॉक सुरूच आहेत. आधी भाजीपाला महागला. नंतर कांद्याने रडवायला सुरुवात केली. लसणीची फोडणीही महागली. त्यामुळे ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’ अशी म्हणण्याची वेळ आली असताना आता कोंबडीचे भावही वधारले आहेत. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी आलेल्या पुराने ही परिस्थिती ओढावली आहे. पुरामुळे भाजीपाल्यासह बाजरी, ज्वारी आणि मका पिकांचेही प्रचंड नुकसान झाले. याचा फटका सध्या कुक्कुटपालन व्यवसायावर झाला आहे. बाजरी, ज्वारी हे कोंबडय़ांचे प्रमुख खाद्य असून त्याचे भाव वाढल्याने खर्च आटोक्यात ठेकण्यासाठी राज्यभरातील केंद्रचालकांनी कोंबडी उत्पादनात घट केली आहे. त्याचा परिणाम सध्या बाजारात दिसत असून मागणी जास्त आणि आवक घटल्याने कोंबडीचे भाव वाढले आहेत. एका आठवडय़ापूर्वी बॉयलर कोंबडीची विक्री प्रतिकिलो 110 रुपयाने बाजारात होत होती. त्यामध्ये 10 रुपयांची भर पडली आहे, तर गावठी कोंबडीचे दर 20 रुपयांनी वाढून 220 रुपये झाले आहेत. नवरात्रीनंतर हा दर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंडय़ांनाही उसळी…
कोंबडीपाठोपाठच अंडय़ांनीही उसळी मारली आहे. कालपर्यंत बाजारात चार रुपयांनी मिळणारे अंडे साडेपाच रुपये दराने मिळत आहे. होलसेल बाजारात सध्या अंडय़ाचा दर शेकडा 428 रुपये झाला आहे. त्यामुळे दुकानदारालाच साडेचार रुपयाला अंडे विकत घ्यावे लागत असल्याचे अंडय़ाचे होलसेल डिलर महेशकुमार नाडार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या