किनगावजवळ आयशर उलटला, ट्रकमधील पपईखाली गुदमरून 15 मजुरांचा जागीच मृत्यू

अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्गावर धुळे जिल्ह्यातून पपई भरून रावेर येथे जाणारा आयशर ट्रक यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ उलटला. यामुळे ट्रकमधील पपईखाली दबून 15 मजुरांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

या अपघातात मृत झालेले सर्व मजूर हे रावेर तालुक्यातील आभोडा, केर्‍हाळा, विवरा आणि रावेर येथील आहेत. मृतांत आभोडा येथील एकाच कुटुंबातील दहा जणांचा समावेश असून त्यात दोन लहान मुलांचा, तर सहा माहिलांचा समावेश आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना जळगाव येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात मृत व्यक्तींचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
धुळे जिल्ह्यातून पपई भरून चोपडामार्गे रावेर येथे जाणार्‍या आयशर वाहन (क्र. एमएच 19 झेड3568) या वाहनाचा अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्गावरील यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ आयशर उलटून पपई भरलेला वाहनाखाली दबून रावेर तालुक्यातील शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार (30, रा फकीर वाडा रावेर), सरफराज कासम तडवी (32, रा केर्‍हाळा, नरेद्र वामन वाघ (25, रा. आभोडा, डिंगबर माधव सपकाळे (55, रा रावेर), दिलदार हुसेन तडवी (20, आभोडा), संदीप युवराज भालेराव (25, रा विवरा), अशोक जगन वाघ (40, रा. आभोडा), दुर्गाबाई संदीप भालेराव (20, रा. आभोडा), गणेश रमेश मोरे (5, रा आभोडा , शारदा रमेश मोरे (दीड वर्ष, रा. आभोडा, सागर अशोक वाघ (3, रा. आभोडा , संगीता अशोक वाघ (35 रा. आभोडा), सुमनबाई शालीक इंगळे (45, रा. आभोडा), कमलाबाई रमेश मोरे (45, रा. आभोडा), सबनुर हुसेन तडवी (53, रा. आभोडा) या 15 मजुरांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.
वाहनात एकूण 21  जण होते. यातील 15 जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांना यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्यात आले आहे.
यावल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बी. बी. बारेला यांनी सर्व मृत व्यक्तींचे शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, यावल येथील पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच अपघात घडल्याचे वृत्त कळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मृत व्यक्तींना बाहेर काढायला मदत केली.

 यावल येथील ग्रामीण रुग्णालयात फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी भेट दिली. दरम्यान भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, निळे निशान सघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी येथे ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

आपली प्रतिक्रिया द्या