जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाजवळील आठ दुकाने फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या 100 मीटर परिसरातील तब्बल आठ दुकाने चोरट्यांनी फोडली. रोख रक्कम चोरीला गेली नसली तरी स्टॉलमधील साहित्याची उलथापालथ झाली आहे. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेली दुकाने फोडून चोरट्यांनी दहशत निर्माण केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या शहरासह ग्रामीण भागात धुडगूस घालणाऱ्या चोरट्यांनी मंगळवारी रात्री कहरच केला. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना थेट आव्हान देणारी धाडसी चोरी केली आहे. गेडाम यांच्या कार्यालया पासून अवघ्या 100 मी. अंतरावर असणाऱ्या जिल्ह्या मुख्यालयातील आठ दुकाने या चोरांनी फोडली आहेत. मात्र, त्यामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलात खळबळ माजली आहे. आतापर्यंत मंदिरे, बंद बंगले, बाजार पेठेतील दुकाने यांना टार्गेट करणाऱ्या चोरांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आव्हान देणारी चोरी केली आहे. त्यामुळे या संशयित चोरांना तात्काळ पकडून हे आव्हान मोडण्याचे काम जिल्हा पोलिसांना करावा लागणार आहे.

मंगळवारी सायंकाळी मुख्यालयातील दुकान धारकांनी आपली दुकान बंद केली. बुधवारी सकाळी रोजच्या प्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेलेल्या संबधीतांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. एक दोन नव्हे तर तब्बल आठ दुकानात चोरी झाल्याचे उघड झाले. मात्र यात दुकान धारकांचे फारसे नुकसान न झाल्याने संबंधीतांनी पोलीसात तक्रार देणे टाळले. सायंकाळी उशिरा याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती.