
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रोजगार गमावणाऱया युवकांना आता हिंदुस्थानी पोस्ट खाते मदतीचा हात देणार आहे. किमान आठवी पास असणारे युवक अथवा प्रौढ व्यक्ती पोस्टात 5 हजार रुपये अनामत भरून पोस्टाची फ्रॅन्चाइसी घेऊ शकणार आहे. या फ्रॅन्चाइसीद्वारे तुम्ही तुमच्या राहत्या जागेतूनही पोस्टाचे व्यवहार आणि टपाल साहित्याची विक्री करून महिना 50 हजार रुपये इतके उत्पन्न मिळवू शकणार आहात. त्यासाठी तुम्ही हिंदुस्थानी नागरिक असून वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले असायला हवे.
देशात पोस्टाची लाखो छोटी मोठी कार्यालये आहेत.पण दुर्गम आणि दूरवरच्या गावागावांत पोस्टाच्या कारभाराचा लाभ देशातील नागरिकांना मिळावा हा पोस्टल फ्रॅन्चाइसी योजनेचा मुख्य हेतू आहे. पोस्टाची सामुग्री टपाल तिकिटे, रिह्यून्यू स्टॅम्प्स, पोस्टल कव्हर्स, आंतर्देशी पत्रे या वस्तूंच्या विक्रीसह पोस्टातून पाठवल्या जाणारी मनिऑर्डर्स, स्पीड पोस्ट, पार्सल्स आणि पोस्ट खात्याचे अन्य व्यवहार करण्याची परवानगी पोस्टाशी त्याबाबतचा लेखी करार केल्यावर तुम्हाला मिळू शकेल. या सर्व व्यवहारापाठी पोस्ट तुम्हाला काही टक्के कमिशन देणार आहे. पोस्टल एजंट बनून ग्राहकांच्या घरी जाऊनही पोस्टाचे व्यवहार करू शकणार आहात. अर्थात फ्रॅन्चाइसी कशी घयायची स्वत:चे प्रॅन्चाइसी कार्यालय थाटून की ग्राहकांना घरपोच टपाल सेवा देण्यासाठी त्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.
तुम्हाला मिळणारे कमिशन असे असेल
– प्रति रजिस्टर्ड पत्र 3 रुपये
– मनिऑर्डर 100 ते 200 रुपये मूल्यासाठी 3.50 रुपये
– मनीऑर्डर 200 रुपयांहून अधिक मूल्यासाठीं 5 रुपये
– प्रति स्पीडपोस्ट 5 रुपये
– पोस्टल स्टॅम्प्स पोस्टल स्टेशनरी मनि ऑर्डर फॉर्म्स विक्रीसाठी 5 टक्के कमिशन
कसे बनाल पोस्टल फ्रॅन्चाइसीचे चालक
ज्यांना पोस्टल फ्रॅन्चाइसी कार्यालय आपल्या मालकीच्या जागेत उघडायचे असेल त्यांनी इंडिया पोस्टच्या संकेतस्थळांवर जाऊन या नव्या पद्धतीची माहिती करून घ्यावी. पोस्टाच्या छापील फॉर्मवर फ्रँचाईसाठी आपला निवेदन अर्ज सादर करावा. त्याची छाननी पूर्ण झाल्यावर पोस्ट ऑफिसकडून मंजुरीचे पत्र मिळाल्यावर 5 हजार रुपये अनामत भरून पोस्ट खात्याशी लेखी करारपत्र (एमओयू) करायचे. या फ्रॅंचाइसीसाठी तुम्ही हिंदुस्थानी नागरिक आणि किमान 8वी पास असायला हवे. शिवाय वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले असायला हवे. पोस्टाचे निवृत्तिवेतनधारक आणि संगणकीय नेटवर्क ज्याच्याकडे असेल त्याला फ्रॅन्चाइसीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.























































