आमचे मुख्यमंत्री  ड्राय क्लीनर होते, मग माझ्यावरच अन्याय का? एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लीनर होते. आरोप झाला की क्लीन चिट द्यायये, पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

‘जनसेवेचा मानबिंदू’ या एकनाथ खडसे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे ऑनलाइन प्रवाशन जळगाव मुक्ताईनगर येथे करण्यात आले. लोक म्हणतात नाथाभाऊ यांचे काही अडकले असेल म्हणून पक्षात अन्याय होऊनही ते पक्ष सोडत नाहीत. असे काही नाही. मी पक्षाविरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला हे नाव घेऊन सांगतो. चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करण्याची धमक आपल्यामध्ये असल्याचे खडसे यांनी ठणकावून सांगितले.

मग तिकीट का दिले नाही?

सगळे म्हणतात नाथाभाऊ चांगले, मग तिकीट का दिले नाही? मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचे दुःख नाही. मराठवाडा, कोकणातून प्रत्येकी तीन मुख्यमंत्री झाले. मात्र उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आला त्याला बाजूला सारले गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्यावर झालेल्या अन्याचा पक्षाच्या वरिष्ठांनाही जाब विचारणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.

लवकरच फडणवीसांच्या कारस्थानांचा भंडाफोड

मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी आपल्याविरुद्ध रचलेल्या कारस्थानांचे सगळे पुरावे आता आपल्याला मिळाले आहेत. दाऊदच्या बायकोवरून झालेले आरोप, मनीष भंगाळे प्रकरण आणि त्याला दिली गेलेली सन्मानाची कागणूक याबाबत लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहून आपल्याविरुद्ध रचलेल्या कारस्थानांचा भंडाफोड करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.