शिवतीर्थावर दसरा मेळाव्याबाबत एकनाथ खडसे यांचे मोठं वक्तव्य…वाचा काय म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडी तसेच ग्रंथालय सेल तर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याबाबत मत व्यक्त केले. शिवाजीपार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, असे खडसे म्हणाले.

वर्षानुवर्षे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजीपार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आला आहे. त्यामुळे दसरा मेळावा साजरा करण्याचा पहिला अधिकार हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहे. त्यामुळे त्यांना परवानगी दिली पाहिजे. महापालिकेने यासंदर्भात धोरण निश्चित करून परवानगी द्यावी आणि त्यांना मिळेल अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे.

टीईटी घोटाळ्यावरूनही एकनाथ खडसे यांनी यावेळी शिंदे सरकारवर निशाणा साधला. या घोटाळ्यामध्ये सरकारमधील मंत्र्यांच्या मुलांचा सहभाग असताना दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न आहे. त्यांच्याकडूनच या घोटाळ्याची चौकशी होते, हे दुर्दैवी असल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले.

‘त्यामुळे तक्रारी करूनही कारवाई होत नाही’
जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागात फार मोठा गोंधळ आहे. गैरव्यवहार व भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे. अनेकदा मी विधान परिषदेत तक्रारी केल्या. त्याची चौकशी सुद्धा झाली. लोडींग आणि अनलोडींगचा ठेका एका गुंडाला दिला असल्याचा आरोपही यावेळी खडसेंनी केला. यात खालपासून वरपर्यंत सर्वांचे हात भ्रष्टाचारने बरबटले आहेत. हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी. त्यामुळे हिला हात लावायला कुणी तयार नाही, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली.