स्वपक्षीयांनी केली पाडापाडी, एकनाथ खडसेंनी दिले चंद्रकांत पाटील यांना पुरावे

9253

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपच्याच काही प्रमुख कार्यकर्त्यांनी आमच्याविरोधात काम केले असल्याचा आरोप केला आहे. या कार्यकर्त्यांचे काही ऑडियो आणि व्हिडीओ आपल्याकडे असून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्याचं खडसे यांनी सांगितले आहे.

भाजप नेत्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मागील काही दिवसांपासून नाराज आहेत. दोनच दिवसांपूर्वी वारंवार अन्याय, अत्याचार होत राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देणाऱ्या खडसे यांनी सोमवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुक्ताईनगर या भाजपच्या पारंपरीक मतदारसंघातून खडसे यांना प्रथम उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या जागी मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. पण पक्षविरोधी कारवायांमुळे तिला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातच भाजपच्या कोअर कमिटीतून काढून टाकण्यात आल्यामुळे राज्यातील भाजप नेतृत्वावर नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी सोमवारी अचानक दिल्लीत दाखल होत भाजपच्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची दिल्लीतील भाजप नेत्यांशी भेट होऊ शकली नाही. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वतुर्ळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

भाजपात पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडायला तयार आहे. पण अचानक मला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून वगळण्यात आले. कोअर कमिटीतूनही काढून टाकले. एवढेच काय, उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रमांतूनही बाजूला ठेवले जात आहे. वारंवार असाच अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला होता.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये पार पडली. या बैठकीपासून एकनाथ खडसे यांना दूर ठेवत फक्त जळगाव जिह्याच्या बैठकीला बोलविण्यात आले. याबद्दल तसेच वारंवार पक्षाच्या कार्यक्रमातून डावलले जात असल्याबद्दल खडसे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. खडसे यांना टार्गेट करण्यात येत आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांच्या भावनांचा विचार आपल्याला करावाच लागेल. शेवटी मी माणूस आहे, देव नाही. मलाही भावना आहेत, असे खडसे यांनी सांगितले.

पराभवाचे पुरावे दिले, कारवाईची वाट पाहू
रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेच पराभवाला सामोरे जावे लागले. याबाबतचे सर्व पुरावे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले आहेत, त्यांच्याकडून काय कारवाई होते याची वाट पाहू, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. फेसबुक आणि व्हॉट्सऍप पोस्टसह कागदोपत्री सर्व पुरावे दिले आहेत. प्रदेश अध्यक्षांनी याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असे खडसे म्हणाले.

ओबीसी नेतृत्वामुळेच पक्ष मोठा झाला
ओबीसी नेतृत्वावर अन्याय झाला अस मी कधी म्हटल नाही. ओबीसी आणि बहुजन समाजातील नेत्यांवर अन्याय होतोय, अशी राज्यभरातील कार्यकर्त्याची भावना आहे. 2 खासदार आणि 12 आमदार असणाऱ्या भाजप सारख्या पक्षाला सत्तेपर्यंत पोहचविण्यासाठी बहुजन समाजाने मोठी मेहनत घेतली. ओबीसी नेतृत्वामुळेच पक्ष मोठा झाला आहे. पक्षाचा चेहरा-मोहरा बदलला हे समजून घ्यायला हवे, असे खडसे म्हणाले.

पक्षातून डावलण्यासाठी चौकशीचा ससेमिरा
अनेक वर्षे मी पक्षाशी एकनिष्ठेने काम करत आहे. मला पक्षाने खूप काही दिले आहे. पण आता मला जाणीवपूर्वक टार्गेट केल जात आहे. एकनाथ खडसे स्पर्धेत राहू नयेत म्हणून काही नेत्यांकडून जाणीवपूर्व हे करण्यात येत आहे. मी काहीही केलेले नसताना माझ्यावर आरोप करण्यात आले. मला पक्षातून डावलण्यासाठी काही कारण नसताना चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचे खडसे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या