पक्षाने आदेश दिल्यास रावेर लोकसभा लढवणार; एकनाथ खडसे यांचे सुनेविरुद्ध निवडणूक लढण्याचे संकेत

पक्षाने आदेश दिल्यास रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिले. जर एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने संधी दिली तर या मतदारसंघात सासरे विरुद्ध सून असा सामना रंगणार आहे.

2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षाने संधी दिल्यास रावेर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

1990 पासून काँग्रेस रावेर लोकसभा मतदारसंघ लढत आहे. मात्र, त्यांना एकदाही यश मिळाले नाही. त्यामुळे इंडिया आघाडीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर नक्कीच चित्र बदलेल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. जळगाव येथे शरद पवार यांच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आगामी लोकसभेची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे, असे म्हणत एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडला असला, तरी त्यांच्या सून रक्षा खडसे या अजून भाजपमध्येच आहेत. त्यामुळे असा निर्णय झाला तर सासरे विरुद्ध सून अशी लढत बघण्यास मिळू शकते.