
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपात असतानाचे अनेक किस्से सांगितले.
पाठीत खंजीर खुपसला नाही
‘द्वेषाचे राजकारण केले नाही. पाठीत खंजीर खुपसला नाही. समोर ठेवून राजकारण केले नाही. मी लेचापेचा नाही. त्यांनी ईडी लावली तर सीडी लावेन, असे जाहीर आव्हान दिले असल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आज पक्ष प्रवेशाच्या वेळी सांगितले.
पक्ष उभारणीसाठी 40 वर्ष झटलो
पक्षाच्या उभारणीनंतर 40 वर्षे भाजपमध्ये काम केले. विधानसभेत किती मानहानी करण्यात आली. माझा गुन्हा काय हे वारंवार विचारत आलो. या क्षणापर्यंत मला उत्तर मिळाले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष करणं हा माझा स्थायीभाव आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
जबरदस्तीने तिकीट…
‘भाजपने अडगळीत टाकले होते. रोहिणी खडसेला तिकीट जबरदस्तीने दिले. पक्षाला मी एवढं दिलं तर मग त्यांनी दिलं तर काय झालं’, असा सवालही एकनाथ खडसे यांनी केला.
मी कोणालाही घाबरत नाही
‘मी कोणत्याही अपेक्षेने राष्ट्रवादीत आलो नाही. जेवढं भाजपाचं निष्ठेने काम केलं त्यापेक्षा जास्त राष्ट्रवादीचं काम करु. पाठीशी भक्कम राहिलात तर मी कुणाला घाबरत नाही’, असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी दिला.
निवडणुकीत ताकद दाखवू
‘शंभर टक्के पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य आले आहेत. पुढच्या निवडणुकीत आमची काय ताकद आहे हे दाखवून देवू’, असे जाहीर आव्हान एकनाथ खडसे यांनी यावेळी दिले.
वरिष्ठांचा राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला
कार्यकर्त्यांची अपेक्षा होती राष्ट्रवादीत येण्याची तशीच इच्छा दिल्लीतील वरिष्ठांनीही माझ्याशी व्यक्त केली आणि मला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्लाही दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. तसेच यापुढच्या काळात जळगावात सागर मैदानावर राष्ट्रवादीचा मोठा कार्यक्रम घेवू असे जाहीर निमंत्रण एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना दिले.
डोक्यावरचं ओझं कमी झालं
‘आज डोक्यावरचं ओझं कमी झालं आहे. हलकं हलकं वाटत आहे, असा रिलॅक्सपणा व्यक्त करतानाच खोट्या केसेस कशा दाखल करण्यात आल्या त्यातून आता बाहेर आलो आहे. माझ्यावर भूखंडाच्या चौकशा लावल्या गेल्या. आता थोडे दिवस जावू दे कुणी किती भूखंड घेतले हे दाखवून देतो’, असे जाहीर आव्हान एकनाथ खडसे यांनी दिले.
वर्षभराच्या आत बदल दिसेल
‘मी राजकीय जीवनातून संपलो होतो. तुम्ही ज्येष्ठ आहात आता पक्षाला मार्गदर्शन करा असे भाजपचे लोक सांगत होते. पण निर्णय झाला होता. आता वर्षभराच्या आत बदल दिसेल’, असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी यावेळी दिला.
पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही – पवार
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खांद्यावर झेंडा घेवून सर्वसामान्य लोकांचे काम करतोय त्यात आता नाथाभाऊंची भर पडली आहे. आमची बैठक झाली. त्यांनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही. पक्षात येऊन कष्ट करण्याची भूमिका नाथाभाऊंनी व्यक्त केली आहे. वाहिन्यांवर अनेक बातम्या येत आहेत परंतु काहीही बदल नाही. आहे तसेच राहणार आहे. हे सर्व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करतील असा विश्वास शरद पवार यांनी आज व्यक्त केला
टायगर अभी जिंदा है – जयंत पाटील
विधानसभेच्या सभागृहात मी भाजप नेत्यांना ‘कटाप्पाने बाहुबली को क्यू मारा’ हा प्रश्न केला होता. आजही ते टिव्ही बघत असतील आणि त्यांना आता कळेल ‘टायगर अभी जिंदा है’ आणि ‘पिक्चर अभी बाकी है’ अशा शब्दात एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार बॅटींग केली.





























































