जे ठरलंय ते सर्वांसमोर यावं! खडसे

3393

महायुतीचं राज्य यावं ही सर्वांची इच्छा आहे. शिवसेना-भाजपामधील ताणतणाव काही दिवसांत मिटेल आणि सत्ता येईल, असा मला विश्वास वाटतो. दरम्यान, केवळ मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेची नाराजी नाही तर शिवसेनेचं म्हणणं आहे जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं. त्यामुळे ज्यांच्यासमोर जे काही ठरलं आहे ते सर्वांसमोर यावं, असे भाजप नेते एकनाथ खडसे म्हणाले.शिवसेना-भाजपात मध्यस्थी करण्याऐवढा आता मी मोठा राहिलो नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

दिवसभर चर्चा, भेटी, बैठका आणि फोनाफोनी

  • महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा प्रश्न कसा सोडवायचा याबाबत दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात बैठक झाली. त्यानंतर भाजप महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि शहा यांच्यात बैठक झाली.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी पक्षाचे प्रमुख नेते व आमदारांची बैठक झाली. सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यात आली.
  • शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’ येथेच सकाळी भेट घेतली. 10 मिनिटे चर्चा केली.
  • काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनीही शरद पवारांना भेटून चर्चा केली.
  • दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
  • काँग्रेस नेते हुसेन दलवाई  यांनी ‘सामना’त संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात भाजपचं सरकार येणार नाही असे ते म्हणाले.
  • अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या निमित्ताने शिवसेना-भाजप मंत्री विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच एकत्र भेटले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीतनंतर  राजकीय बोलणी झाल्याची चर्चा आहे.
  • मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. राजकीय परिस्थितीबाबत विचारविनिमय करून उद्या राज्यपालांची भेट घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

मुख्यमंत्री ऑफ स्क्रीन

राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या टीव्ही चॅनेलच्या स्क्रीनपासून लांबच आहेत. सध्या टीव्ही माध्यमांना मुख्यमंत्र्यांनी दूरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरच सोपवली आहे. पत्रकारांना वर्षा बंगल्यापासून दूर उभे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या