
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीत रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. रावेरसाठी राष्ट्रवादीकडून 7-8 उमेदवार इच्छुक आहेत. त्या उमेदवारांची आज शरद पवारांसोबत बैठक झाली. शरद पवारसाहेबांसह जयंत पाटील आणि पक्षाचे इतर नेतेही या बैठकीत उपस्थित होते. यावेळी इच्छुकांसोबत चर्चा झाली. त्यातून काही उमेदवारांची छाननी करण्यात आली. छाननी केलेल्यांपैकी एकाची निवड उमेदवारीसाठी शनिवारपर्यंत जाहीर होईल, असे आपल्याला वाटत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
रावेर लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. कारण माझी प्रकृती ठीक नाही. डॉक्टरांनीही मनाई केली आहे. यामुळे मी रावेरमधून निवडणूक लढवणार नाही. आपली कन्या रोहिणी खडसेही रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवणार असल्याचे रोहिणीताईंनी म्हटले आहे, असे खडसेंनी सांगितले.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी महाविकास आघाडीत जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. चार-सहा जागांवर चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसांत त्यावरही अंतिम निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार जनता नाराज आहे. याचा फायदा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला होईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.
खडसे विरुद्ध खडसे असा संघर्ष निर्माण व्हावा म्हणून भाजपने रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली का? असा प्रश्न यावेळी एकनाथ खडसेंना विचारण्यात आला. ‘अशा अनेक कथा आता जन्माला येतील. पण असे काहीही नाही. हा प्रत्येक पक्षाचा आपला निर्णय असतो. पक्षाच्या निर्णयानुसार आणि धोरणानुसार आम्ही काम करतो’, असे उत्तर खडसेंनी दिले. ‘उमेदवार घोषित झाल्यानंतर रावेरमध्ये सामना अत्यंत चुरशीचा होईल. राष्ट्रवादीचा उमेदवार नक्कीच विजयी होईल. तितका तगडा उमेदवार आम्ही देणार आहोत’, असे खसडे म्हणाले. भाजपने एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यावर एकनाथ खडसे यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.


























































