बीकेसीवरील मेळाव्यात एकनाथ शिदेंनी वाचली भाजपची स्क्रिप्ट; राजकीय, सामाजिक स्तरातून फुटीरांवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटीरांकडून बीकेसी मैदानावर दसऱयाला मेळावा घेण्यात आला. मात्र या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाचून दाखवलेल्या भाषणावरून राजकीय तसेच समाजिक स्तरावरून जोरदार टीकाटिप्पणी केली जात आहे. शिंदे यांचे भाषण म्हणजे भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्टच होती. मुख्यमंत्री भाजपच्या हातचे बाहुले असल्याचे जनतेने पाहिले, अशी बोचरी टीका काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांकडून करण्यात आली.

मतदारांनी, शिवसैनिकांनी कुणाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

‘‘भाषणाची सर्वांना उत्सुकता होती. दोन्हीकडे गर्दी झाली होती. मीडियानेही अनेकांच्या मुलाखती घेतल्या, त्या वेळी काहींनी आम्हाला का आणलं आहे हेच माहिती नाही असं सांगितल्याचं मी ऐकलं. माझे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होते. संध्याकाळी आईला भेटण्यासाठी गेल्यानंतर तिथे टीव्हीवर मी भाषणं ऐकली. त्यांच्या भाषणावर आम्ही टीका करण्याचं काही कारण नाही. पण महाराष्ट्रातील जनता आणि विशेषतः मतदारांनी, शिवसैनिकांनी आपण काय केलं पाहिजे, पुढील भूमिका काय असली पाहिजे, कोणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कोणाची मूळ शिवसेना आहे याचा विचार केला पाहिजे,’’ असाही सल्ला अजित पवार यांनी दिला.

काही भाषणं नको तितकी लांबली – अजित पवार

कोणाचं भाषण तुम्हाला आवडले, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला असता ते म्हणाले, आवडी निवडीसाठी ही भाषणं नव्हती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून विचार ऐकण्यासाठी दसऱयाच्या शुभमुहूर्तावर शिवसैनिक शिवाजी पाका&त येत होते. आता पिढय़ा बदलल्या आहेत. एसटीला 10 कोटी रुपये देऊन लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. मला काहींनी बसेस तिथे गेल्याने सणाच्या दिवशी इतर सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाल्याचे सांगितले. अशा गोष्टी करता कामा नयेत. पण काही भाषणं फारच लांबली, नको तिथे लांबली. आता ती कोणती ते तुम्हीच ठरवा, असा टोलाही अजित पवार यांनी फुटीरांना लगावला.

गद्दारीचे पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका- नाना पटोले

मुंबईतील बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागांतून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती; परंतु या जनतेने शिंदेंचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भाजपच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने काल पाहिले, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. वास्तविक पाहता एकनाथ शिंदे यांची गद्दारी हा त्यांचा व शिवसेना पक्षाचा अंतर्गत विषय आहे. परंतु आपल्या बंडखोरीचे पाप झाकण्यासाठी एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक मंत्री, आमदार वारंवार काँग्रेसवर टीका करत आहेत ते आम्ही खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदे यांना स्वतःचा पक्ष कोणता आहे हे माहीत नाही त्यांनी काँग्रेसवर बोलणे हास्यास्पद आहे. एकनाथ शिंदे यांची कामगिरी काहीही नाही. भाजपच्या इशाऱयावर काम करणे व दिल्लीच्या आदेशाची अंमलबजावणी करणे एवढेच त्यांचे कर्तृत्व आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी शिंदेंवर निशणा साधला.

सध्याच्या राजकीय नाटय़ाचे दिग्दर्शन, स्क्रिप्ट रायटिंग, कॅमेरामनही भाजपचे – प्रकाश आंबेडकर

भाजपला एका शिवसेनेच्या दहा शिवसेना करायच्या आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय नाटय़ाचे दिग्दर्शन, स्क्रिप्ट रायटिंग तसेच कॅमेरामनही भाजपचे आहेत. सध्याच्या राजकीय स्थितीत महाराष्ट्रातील जनता कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत देत नसल्याचे चित्र आहे. सध्या सुरू असलेले राजकारण हे महाराष्ट्राची परंपरा नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली.