
>>नीलेश कुलकर्णी
दिल्लीच्या प्रतिष्ठत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) जो राजकीय कार्यक्रमासाठी जातो त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होतो, असा आजवरचा ‘इतिहास’ आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या अंधश्रद्धारूपी मिथकाची जोरदार चर्चा असते. या अंधश्रद्धेला घाबरूनच जेएनयूमधील मराठी अध्यासन केंद्राच्या कार्यक्रमाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी दांडी मारल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.
जेएनयूला चळवळींचा अड्डा मानले जाते. मात्र या विद्यापीठाच्या परिसरात कोणी राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमालादेखील राजकीय व्यक्ती गेली की नंतरच्या काळात ती व्यक्ती अडचणीत येते, असा इतिहासाचा दाखला सांगितला जातो
जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती पदावरून पायउतार होण्यापूर्वी दोनच दिवस अगोदर जेएनयूमध्ये एका कार्यक्रमासाठी जाऊन आले होते. त्यामुळे जेएनयूबद्दलच्या अंधश्रदेला सध्या चांगलीच पह्डणी मिळाली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील एकेकाळी जेएनयू हे आपले कार्यक्षेत्र बनविले होते. त्यानंतरच्या काळात इराणी या सक्रिय राजकारणातून बाजूला पडल्या. जेएनयूमधून पुढे आलेले तरुण नेते कन्हैया पुमारदेखील नंतरच्या काळात सक्रिय राजकारणातून बेदखल झाले. या पार्श्वभूमीवर जेएनयूमध्ये होणाऱ्या मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटनाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिंदे हे दर अमावस्येला त्यांच्या दऱ्हे या मूळ गावी जातात. त्याचीही मोठी आख्यायिका आहे. दुपारपर्यंत शिंदे हे पंढरपुरात होते. त्यानंतर दे दऱ्हे गावी जातील, असे सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच मी आयुष्यात कधी देवपूजा केली नाही, असे छातीठोकपणे सांगणारे अजित पवार या जेएनयूच्या अंधश्रद्धेला मात्र घाबरल्याचे दिसून आले. दिल्लीचा हा दौरा टाळण्यासाठी त्यांनी मुंबईत मंत्रालयातच काही बैठका जाणीवपूर्वक लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.