
राज्यामध्ये पोलिसांसाठी घरे निर्मितीची संख्या देखील वाढली पाहिजे. महानगरांमध्ये विविध विकास प्राधिकरणांच्या मार्फत बांधल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पोलिसांसाठी घरे असायला हवीत. सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करताना त्यात पोलिसांसाठी विशेष गृह बांधणी प्रकल्पांचा समावेश सिडकोने आपल्या धोरणात करावा, असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
वांद्रे येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सभागृहात नगरविकास मंत्र्यांनी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको या विभागांच्या कामाचा आढावा घेतला त्या वेळी ते बोलत होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोलीस 12 तास सेवा बजावतात. शिवाय त्यांना घरी येण्याजाण्यासाठी किमान तीन-चार तासांचा प्रवास करावा लागतो. या सगळ्याचा परिणाम त्यांना सेवा बजावताना होतो. म्हणून पोलिसांसाठी हक्काचे घर आवश्यक आहे. त्यामुळे सिडको नवी मुंबईत सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचे जे प्रकल्प उभारीत आहे त्यात पोलिसांसाठी विशेष तरतूद करावी. त्यासाठी धोरणामध्ये त्याचा समावेश केला जाका, अशी सूचनाही एकनाथ शिंदे यांनी या वेळी केली.
घरांचे स्वप्न पूर्ण होईल
हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सहाय्यभूत ठरते, मात्र अनेकांना केवळ उत्पन्न मर्यादा, मासिक वेतन नसणे, अशा छोटय़ा छोटय़ा व्यवसायांवर आधारित असलेल्यांना राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले तर त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
या वेळी एनएमआरडीए, सिडको यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा नगरविकास मंत्र्यांनी घेतला. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी संबंधितांना दिल्या. या वेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गृहप्रकल्प वेळेत पूर्ण करा
गृह बांधणी प्रकल्पातील बांधकामाचा दर्जा अधिक गुणवत्तापूर्ण कसा राहील त्याचबरोबर असे गृहप्रकल्प वेळेत पूर्ण होतील यासाठी सिडकोने विशेष काळजी घेतली पाहिजे. समाजातील ज्या घटकांचे उत्पन्न मर्यादित आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज दिले पाहिजे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.




























































