
शिंदे-फडणवीस सरकारचं घोडं अखेर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गंगेत न्हालं आणि गेला आठवडाभर लटकलेले मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. या विस्तारात भाजप तुपाशी, तर शिंदे गट उपाशीच राहिल्याचे चित्र आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘नगरविकास’वर समाधान मानावे लागले असून गृह, अर्थ, ऊर्जा आणि गृहनिर्माण ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत. भाजपकडे महसूल, ग्रामविकास, सहकार, पर्यटन अशी तगडी खाती आहेत, तर शिंदे गटाला मात्र पाणीपुरवठा, बंदरे, उद्योग, शालेय शिक्षण यावरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे आठवडाभर लटकवण्याचा केलेला अट्टहास याचसाठी होता का, असा सवाल आता शिंदे गटातील आमदार करीत आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर तब्बल 40 दिवस मंत्रिमंडळ विस्तार रखडला. शिंदे-फडणवीस द्वयी ‘लवकरच’चा जप करीत राहिली आणि अखेर विस्तारासाठी मुहूर्त मिळाला. विस्तारानंतर मंत्र्यांचे खातेवाटप तरी लगेच होईल असे वाटत असतानाच तब्बल आठवडाभर ‘खातेदार’ जाहीर झाले नाहीत. वजनदार खात्यांवरून कलह झाल्यानेच खातेवाटप लटकले होते. विशेष म्हणजे ‘गृह’खाते कोणाकडे असावे यावरून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीच भिडले होते. इतर खात्यांवरूनही घमासान होतेच. हा गृहकलह भाजपच्या दिल्ली दरबारातही पोहोचला. अखेर आज खातेवाटपाला मुहूर्त मिळाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते सायंकाळी जाहीर केले.
भाजपचाच वरचष्मा
खातेवाटपात भाजपचाच वरचष्मा दिसत आहे. गृहखाते फडणवीसांकडे आहे तर मुख्यमंत्री शिंदे यांनी सामान्य प्रशासन, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, परिवहन ही खाती स्वतःकडे ठेवली आहेत. वजनदार खात्यांसाठी वाद घालूनही शिंदे गटाच्या वाटय़ाला काहीच न आल्याचेच हे चित्र आहे.
नसीब अपना अपना
सुधीर मुनगंटीवार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील स्पर्धक मानले जातात. मात्र त्यांच्यावर वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय सोपवून भाजपने त्यांना धक्का दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषिमंत्री असलेले दादा भुसे यांना चक्क बंदरे व खनिकर्म खाते देऊन त्यांची बोळवण केली आहे.
कधीकाळी मंत्रिमंडळात दोन नंबरचे मंत्रीपद भूषविलेल्या चंद्रकांत पाटील यांना थेट तळाकडे ढकलले असून त्यांना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्राsद्योग आणि संसदीय कार्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुनगंटीवार आणि पाटील यांचे डिमोशन करताना तीन वर्षांपूवीच भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना मात्र महसूल खाते देऊन निष्ठावंतांना धक्काच दिला आहे.
ज्यांना मंत्रीपद मिळेल की नाही अशी शंका होती त्या अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद तर मिळालेच, पण कृषी खातेही मिळाले.
राज्य मंत्रिमंडळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास
गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे – बंदरे व खनिकर्म
संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन
सुरेश खाडे – कामगार
संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत – उद्योग
प्रा. तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
अब्दुल सत्तार – कृषी
दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास


























































