कोल्हापुरातील हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱयांना कर्जमाफीचे गाजर दाखवत राज्यातील सरकार दीर्घकाळ झुलवत ठेवत आहेत. सरकारने वेळोवेळी कर्जमाफी देताना, नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांना जाहीर केलेले पन्नास हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान आजतागायत पन्नास टक्के शेतकऱयांनाही मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या कर्जमाफीच्या योजनेला शिंदे-फडणवीस सरकारने अद्यापि प्रलंबित ठेवले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिह्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

2019 मध्ये आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱयांना दोन लाखांची कर्जमाफी जाहीर करताना, नियमित कर्जफेड करणाऱयांना 50 हजार रुपये कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असतानाच, महाविकास आघाडीचे सरकार कोसळले अन् सर्वच प्रक्रिया ठप्प झाली. कोरोनामुळे या काळात बहुतेक शेतकऱयांनी कर्जफेड केली नाही. दोन लाखांच्या कर्जफेडीची ते वाट पाहत राहिले.

नंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हा विषय हाती घेईपर्यंत तब्बल दोन हंगाम निघून गेले आहेत. अनेकजण पन्नास हजारांचे अनुदान मिळेल, या आशेवर राहिले. शिंदे-फडणवीस सरकारने कर्जमाफीच्या प्रक्रियेची पुनर्रचना करताना केवळ प्रोत्साहनपर अनुदानासाठी लाभार्थी शेतकऱयांच्या याद्या बँकांकडून मागविल्या. यातील प्रत्येक सोसायटीच्या केवळ पन्नास टक्के लाभार्थींनाच आजमितीस हे प्रोत्साहन अनुदान मिळालेले आहे.

इतर शेतकरी पात्र असतानाही त्यांना हा लाभ मिळालेला नाही. तो का मिळत नाही, याविषयी सरकार आणि बँकांकडून प्रतिसाद मिळत नाही. याद्या वर पाठविल्या आहेत, पुढील आम्हाला माहिती नाही, असे बँकांचे उत्तर ऐकून शेतकरी वैतागलेले आहेत. त्यामुळे शेतकऱयाने जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याचे सरकार शेतकऱयांचे आहे, असे ऊर बडवून सांगणारे सरकार मात्र या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

बँकांनी हात वर केले

शिंदे-फडणवीस सरकारने केवळ प्रोत्साहनपर अनुदानासाठी लाभार्थी शेतकऱयांच्या याद्या बँकांकडून मागविल्या. इतर शेतकरी का पात्र नाहीत, याविषयी बँकांकडे विचारणा केल्यास त्यांनी याद्या वर पाठविल्या आहेत. यापुढे आम्हाला काही माहीत नाही, असे म्हणत बँकांनी हात वर केले आहेत.

प्रोत्साहनपर अनुदान या महत्त्वाच्या प्रश्नासाठी सरकार टोलवत आहे. काहींना याचा लाभ मिळाला; परंतु आम्ही किती वेळ वाट पाहायची? शेतकऱयांच्या यादीत जे काही प्रश्न, त्रुटी असतील, त्याची पूर्तता करून हा प्रश्न सोडवून शेतकऱयांना ‘प्रोत्साहन’ मिळावे.

– सचिन गुरव, शेतकरी, केळोशी बुद्रुक, कोल्हापूर