मिंध्यांनी अजित पवारांपुढे गुडघे टेकले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिंधेंनी अजित पवार यांच्यापुढे सपशेल गुडघे टेकले आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार यांच्या नावाने गळा काढत मिंधेंनी पक्ष सोडला होता. आज त्याच मिंधेंवर अजितदादांची वाहवा करण्याची वेळ आली आहे. आम्ही अजिबात नाराज नाही. अजित पवार सोबत आल्याने आमचे सरकार मजबूत झाले आहे, असे विधान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

अजित पवार यांचा बंडखोर गट ‘ईडी’ सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मिंधे गटात प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक आमदार शिंदेंना याबाबत उघडपणे जाब विचारत आहेत. त्यात मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यामुळेही आमदारांत वाजलं आहे. एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांनी मात्र सगळं काही आलबेल असल्याचा आव आणला आहे. 

मिंधे तेव्हा काय म्हणाले होते… 

अजित पवार आमच्या आमदारांवर अन्याय करत होते. आमदारांना निधी उपलब्ध करून देत नव्हते. राष्ट्रवादी पक्ष शिवसेना गिळायला निघाला होता. शिवसेनेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला अजित पवार ताकद देत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, असा आव शिंदेंनी आणला होता. 

सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही… 

भाजप नेतृत्वाने अजित पवारांना जवळ केल्याने शिंदेंची पुरती काsंडी झाली आहे. अजित पवारांबाबतची शिंदेंची विधाने सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांना नेटकरी ट्रोल करत आहेत. अनेक मीम्सही फिरत आहेत. ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’, अशी मिंध्यांची अवस्था झाल्याची खिल्ली नेटकरी उडवत आहेत.  

अजित पवार सोबत आल्याने आता आमचं ट्रिपल इंजिन सरकार झाल्याचे सांगणाऱया शिंदे यांनी आज पुन्हा अजित पवार यांची स्तुती केली. आमच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोन शक्तींचे पाठबळ आहे, असेही शिंदे म्हणाले. मी राजीनामा देणार ही अफवा असल्याचा दावाही त्यांनी केला. 

मिंधे आता काय म्हणाले…

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने आम्ही नाराज नाही. उलट सरकार आणखी मजबूत झाले आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सोबत घ्यायचे ठरवले, असे शिंदे म्हणाले. सरकार पडणार या अफवा असून सरकारला धोका नाही, असा दावा शिंदे यांनी केला. 

अजित पवार मुख्यमंत्री होणार असे विचारताच… 

अजित पवार मुख्यमंत्री होणार हे खोटे आहे, असे मिंधे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. बहुमत असतानाही कुणी सोबत येत असेल तर त्याचे स्वागत करायला काय हरकत आहे, असे विधान त्यांनी अजितदादांच्या सरकारमधील एंट्रीवर केले. एक भाकरी मिळणार होती ती आता अर्धी मिळेल. त्यात वेगळे काय? दोघांमध्ये आता मंत्रिपदे वाटली जातील. एकदोन इकडे तिकडे होऊ शकतील, असेही ते म्हणाले.