भुजबळांच्या उमेदवारीला मिंधे गटाचा विरोध; गोडसेंची पळापळ

भाजपापाठोपाठ आता मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकल्याने मिंधे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांची पळापळ सुरू झाली आहे. आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी पदाधिकाऱयांसह ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी बुधवारी रवाना झाले. भुजबळांच्या उमेदवारीला मिंधे गटाने जोरदार विरोध केला आहे. महायुतीत नाशिकच्या उमेदवारीवरून एकमत होत नाही. मतदारसंघात आमचीच ताकद जास्त असे सांगत भाजपाने येथे दावा ठोकला. यानंतर मिंधे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी साकडे घातले. या घटनेला तीन दिवस उलटत नाही तोच आता येथे मंत्री छगन भुजबळ यांनी दावा ठोकला. राष्ट्रवादीने घडय़ाळाच्या चिन्हावर येथे निवडणूक लढवावी असे सांगत त्यांनी स्वतःच्या उमेदवारीचे संकेत दिले, भाजपात जाऊन कमळ हाती घेणार नाही, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. भुजबळांच्या एण्ट्रीने मिंधे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.