Lok Sabha Election 2024 : कल्याणमध्ये मिंधेंना भाजपचा ‘अंडरकरंट’

पहिल्या आठ उमेदवारांच्या यादीत ठाणे आणि कल्याणचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी कल्याणमधून मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे हे उमेदवारी लढतील, असा दावा मिंधे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र श्रीकांत शिंदे यांनी भाजप कार्यकर्त्यांची केलेली छळवणूक, त्यांची वारंवार केलेली कोंडी आणि अपमानास्पद वक्तव्य यामुळे भाजपच्या गोटात संतापाची खदखद आहे. त्याचाच ‘अंडरकरंट’ श्रीकांत शिंदेंना बसेल, अशी चर्चा कल्याण, डोंबिवलीच्या वर्तुळात सुरू आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अद्यापि अधिकृत घोषणा झाली नसली तरी आधीपासूनच श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. शिंदे यांनी शिवसेनेशी केलेला दगाफटका कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आवडलेला नाही. हाच रोष लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्रातूनही दिसून येईल अशी चर्चा आहे.

केसरकरांचा श्रीकांत शिंदेंना अपशकुन

मिंधे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनीच मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना अपशकुन केला आहे. कल्याणची जागा भाजपला द्या आणि ठाण्यात लढा असे त्यांनी नवी मुंबईत बोलताना सांगितले. भाजपच्या दबाव तंत्रामुळे एकीकडे ठाणे आणि कल्याण दोन्ही मतदारसंघ मिळवण्यासाठी मिंर्धेची दमछाक होत असतानाच त्यांच्याच गटाचे आमदार केसरकर यांनी कल्याण भाजपला द्या, असे सांगत श्रीकांत शिंदेंची विकेटच काढली आहे.

शिंदेंविरोधात थेट प्रदेशाध्यक्षांना साकडे

कल्याण लोकसभा मतदारसंघात बहुतेक सर्वच ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात वातावरण असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला होता. त्यात श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यास ठाम विरोध करण्यात आला. त्यांचे काम आम्ही कोणत्याही परिस्थितीत करणार नाही, असा ठरावच चव्हाण यांच्या सहमतीने करण्यात आला. दिव्यामध्ये तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून कल्याण लोकसभेची जागा कमळ चिन्हावरच लढवली जावी, असा आग्रहच धरला आहे.

अंबरनाथ, कल्याण ग्रामीण, उल्हासनगरात विरोध

अंबरनाथमधील मिंधे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्या निष्क्रीय कारभाराविरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्याचा फटका श्रीकांत शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे. कल्याण ग्रामीणमधून मनसे आमदार राजू पाटील उघडपणे शिंदेंचे वाभाडे काढत आहेत. तर उल्हासनगरात भाजप कार्यकर्त्यांचा श्रीकांत शिंदेंना छुपा विरोध आहे.

गायकवाड प्रकरण भोवणार

भाजपचे कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणात तुरुंगात आहेत. ही वेळ त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्यामुळे ओढवली, त्यांच्यामुळेच मी गुन्हेगार झालो असा जाहीर आरोप गायकवाड यांनी केला. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची खदखद असून त्याचा फटकाही श्रीकांत शिंदे यांना बसेल, असे चित्र आहे.