एकवीरा आई, महाविकास आघाडीला आशीर्वाद दे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्याने नवी मुंबईतील शिवसैनिकांनी आई एकवीरा देवीला 56 नारळांचे तोरण वाहून खणानारळाने ओटी भरली. तसेच शेतकरी, कामगार गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला आशीर्वाद देण्याचे साकडे यावेळी घालण्यात आले.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा यासाठी शिवसेना नवी मुंबई व शिवसहकार सेनेने एकवीरा देवीला नवस केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी नवी मुंबईतील शिवसैनिक एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले. 56 नारळांचे तोरण, साडी, खण, नारळाची ओटी अर्पण करून नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आशीर्वाद देण्याचे साकडे घातले.

शिवसहकार सेनेचे सरचिटणीस व नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, हरिभाऊ म्हात्रे, प्रफुल्ल म्हात्रे, संतोष घोसाळकर, जिल्हा संघटक निळकंठ तायडे, उपशहरप्रमुख वासुदेव म्हात्रे, रचना शिंदे, शिवसहकार सेनेच्या चिटणीस रंजना नेवाळकर, नगरसेवक रामदास पवळे, दमयंती आचरे, मेघाली राऊत यांच्यासह संपर्कप्रमुख वैशाली घोरपडे, सुरेखा गव्हाणे, हरिश्चंद्र ठाकूर, सुनील काटमोरे, बाळासाहेब शिंत्रे, राजूराव, उपशहरप्रमुख मनोज इसवे, बंडू म्हात्रे, भाऊ भापकर, महेश खैरनार, हेमंत जैसवाल, गोपीनाथ आगास्कर असे 173 पदाधिकरी यावेळी उपस्थित होते.