शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली वृद्धाची 19 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. फसवणूकप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते घाटकोपर परिसरात राहतात. पंतनगर येथे त्याचे एक दुकान आहे. तीन वर्षांपूर्वी त्याची भटवाडी आणि बर्वेनगर येथे राहणाऱ्या दोघांशी ओळख झाली होती. ओळखीनंतर त्या दोघांनी तक्रारदारांना शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने 2019 ते 2020 मध्ये 19 लाख 50 हजार रुपयाची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर वर्षाला वीस टक्के नफा मिळेल असे सांगितले होते. मात्र दिलेल्या मुदतीत नफ्याची रक्कम मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. वृद्धाने दिलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.