
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या नियुक्तीला पक्षातूनच कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेतील बदलांची वैध कागदपत्रेच आमच्याकडे सादर करण्यात आलेली नाहीत, असे पत्र सुनेत्रा पवार यांना पाठविले आहे. यामुळे अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळी झालेल्या ठरावात पक्षाच्या घटनेत काही बदल केले गेले आहेत. या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाहीत. पक्षाची सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का? राष्ट्रीय पदाधिकाऱयांच्या नेमणुका नियमांनुसार करण्यात आल्या होत्या का? या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ वैध कागदपत्रे लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना दिल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या पत्रात काय?
सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला 10 मार्च आणि 7 एप्रिल रोजी जी पत्र पाठवण्यात आली होती त्या पत्रांनुसार पक्षाच्या घटनेत कलम 6, 7, 12, 18(1), 32 आणि 36मध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र आयोगाकडे जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये केवळ कलम 18(1) संदर्भातील ठरावाचा समावेश आहे. यामुळे पक्षाच्या घटनेत जे जे बदल करण्यात आले त्याबाबत वैध कागदपत्रे जमा करावीत, असे निवडणूक आयोगाने पत्रात म्हटले आहे.
































































