पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून 58 लाख नावे हटवली

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, राजस्थान आणि पुद्दुचेरी येथील एसआयआर मोहिमेनंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तब्बल 58 लाख 20 हजार 898 मतदारांची नावे मतदार यादीतून हटविण्यात आली आहेत. याशिवाय राजस्थानमधून 41.85 लाख आणि पुद्दुचेरीतून 85 हजार मतदारांची नावे हटविण्यात आली आहेत. दरम्यान, इतक्या मोठय़ा प्रमाणात मतदारांची नावे काढण्यात आल्याने बंगालमधील वातावरण तापले असून सत्ताधारी तृणमूल काँगेस पक्ष आक्रमक झाला आहे. येत्या काळात हा मुद्दा अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.

जिथे तृणमूलचे वर्चस्व तिथे जास्त नावे वगळली

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघातून 44,787 मतदारांची नावे हटविण्यात आली आहेत. याउलट भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या नंदीग्राम येथून 10,599 मतदारांची नावे वगळली आहेत. तृणमूलचे नेते फिरहाद हकीम यांच्या कोलकाता पोर्ट मतदारसंघातून 63,730 नावे वगळण्यात आली आहेत. तृणमूलचे दिग्गज नेते असलेल्या ठिकाणी जास्त नावे वगळण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे.