
सामना प्रतिनिधी । नगर
मतदारांना प्रलोभन दाखवणे हे योग्य तर नाहीच मात्र त्यासंदर्भात जर तक्रार आली असेल तर निश्चित त्याची चौकशी केली जाईल व कारवाईसुद्धा केली जाईल, अशी ग्वाही राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. नगर येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी नगर येथे ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जे वक्तव्य केले त्या संदर्भात छेडले असता सहारिया यांनी त्याबाबतीत तक्रार माझ्याकडे आलेली नाही. ती जिल्हाधिकाऱ्यांकडे आली आहे. त्यांनी अहवाल पाठवल्यानंतर त्याची शहानिशा करुन योग्य ती कारवाई करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सदर अहवाल गोपनीय असल्यामुळे तो देता येत नाही, असे जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
उमेदवारांनी निवडणूक खर्च देताना ट्रू वोटर माध्यमातून निवडणूक खर्च द्यावा, असे बंधन घालण्यात आलेले आहे. जर त्यांनी त्यानुसार खर्च दिला नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल व तसेच त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल अशा प्रकारचा कायदा केला असल्याचेही सहारिया यांनी यावेळी सांगितले
निवडणुकीची प्रक्रिया दिवसेंदिवस क्लिष्ट होत चालली आहे यासंदर्भात विचारल्यावर त्यांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर उमेदवारांनी करावा असे आम्ही निर्देश दिलेले आहेत. काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे काही विलंब लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले नाहीत त्यांना सुद्धा आम्ही मुदत दिली आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरावा लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सोशल मीडियाचा वापर निवडणुकीमध्ये होत आहे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र असे पथक नेमलेले आहेत. जो उमेदवार याची परवानगी घेणार नाही त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सोशल मीडियाद्वारे झालेला खर्च हा निवडणुकीमध्ये धरावा लागणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नगर शहरामध्ये पोलीस विभागाने निवडणुकीपासून विविध प्रकारच्या कारवाया केलेल्या आहेत. शहरांमध्ये 326 मतदान केंद्र असून त्यातील 134 संवेदनशील मतदार केंद्र आहेत तर 41 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. 2000 पोलीस कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात केले असल्याचेही सहारिया यांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी विविध प्रकारच्या कारवाई करून प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. रेल्वे, राज्य महामार्ग अशा विविध ठिकाणी आम्ही नाकाबंदी करणार आहोत व तेथे सुद्धा तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाने या इथे केलेली कामे योग्य पद्धतीने केलेली आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
निवडणुका पारदर्शक पद्धतीने तसेच निर्भय पद्धतीने व्हावी, याकरिता प्रशासनाने ठोस उपाययोजना केली असल्याचेही यावेळी सहारिया यांनी सांगितले. निवडणुकीमध्ये उमेदवारांना पाच लाख रुपये खर्चाची मर्यादा देण्यात आलेली आहे. जर त्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये खर्च झाला असेल तर तो उमेदवार पात्र ठरणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकसभा व विधानसभा एकत्रित झाल्या तर आयोगाची तयारी आहे का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी या संदर्भात बोलायचे टाळले.

































































