शाळांच्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्टय़ा आणि गावी गेलेले शिक्षक मतदार या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर मान्य केली आहे. निवडणुका पुढे ढकल्यात आल्या असून निवडणुकांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर होतील.
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 मे 2024 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली होती. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार या चार मतदारसंघांत येत्या 10 जून रोजी मतदान होऊन 13 जूनला मतमोजणी होणार होती.
मात्र राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्टय़ा सुरू असून शाळा 10 ते 15 जूनच्या दरम्यान भरणार आहेत. अनेक शिक्षक मतदार उन्हाळी सुट्टीसाठी आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी राजकीय पक्ष तसेच लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यापूर्वी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत मुंबई पदवीधरमध्ये शिवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेचे किशोर दराडे यांच्या सदस्यत्वाची मुदत 7 जुलैला संपत आहे. त्यामुळे आयोगाला 7 जुलैपूर्वी निवडणूक घ्यावी लागेल.
राज्य शिक्षक सेनेच्या मागणीला यश
निवडणुका पुढे ढकलल्यानंतर राज्य शिक्षक सेनेने आयोगाचे आभार मानले. निवडणूक आयोगाने 8 मे रोजी या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्याचक्षणी राज्य शिक्षक सेनेचे प्रातांध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून उन्हाळी सुट्टीत शिक्षक बाहेरगावी गेले असल्यामुळे सर्वच नोंदणीकृत शिक्षकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून ऐन उन्हाळी सुट्टीत होणाऱया या निवडणुका आता शाळा सुरू झाल्यावर होणार आहेत. शिक्षक भारती संघटनेच्या वतीनेही मुंबई उच्च न्यायालयात या निवडणुका 15 जूननंतर घेण्याची मागणी करण्यात आली होती.