जालना जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षणाला 206 कर्मचाऱ्यांची दांडी; कारवाईचा इशारा

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीचे 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या प्रशिक्षणात दोन्ही सत्रात 994 कर्मचाऱ्यांपैकी 206 कर्मचारी अनुपस्थित होते. त्यामुळे अनुपस्थित कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार छाया पवार यांनी दिला आहे.

बदनापूर तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. तालुक्यात 183 बुथवर ही निवडणूक होणार आहे. बदनापूर निवडणूक विभागाने तालुक्यातील शासकीय, खासगी शिक्षण संस्था, पंचायत समिती आदी कार्यालयात कार्यरत असलेल्या 994 कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी वॉरंट काढून प्रशिक्षणासाठी बोलवले होते. त्यानुसार 1 जानेवारी रोजी सकाळ आणि दुपारच्या सत्रात कर्मचाऱ्यांना ग्राम पंचायत निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

ग्रामपंचायत निवडणुका व्यवस्थित पार पाडाव्यात म्हणून निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार छाया पवार यांनी 9 जानेवारी रोजी सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात 994 कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. मात्र या दोन्ही सत्रात जवळपास 206 कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने बदनापूर निवडणूक विभाग धास्तावला आहे. तसेच प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी नोटिसा बजावण्याचा इशारा तहसीलदार छाया पवार यांनी दिला आहे.

9 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात आयोजित प्रशिक्षणात तहसीलदार छाया पवार, नायब तहसिलदार रामेश्वर दळवी, अव्वल कारकून समद फारुकी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, बदनापूर तालुक्यात 60 ग्रामपंचायत निवडणुका होत असून निवडणूक विभागाची पूर्ण तयारी झाली आहे. निवडणूक कर्मचार्यांनी 14 जानेवारी रोजी सर्व साहित्य तपासून घ्यावे. निवडणूक कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्वांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी, असे सांगून ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रशिक्षण या वेळी झाले.

आपली प्रतिक्रिया द्या