
नगर जिह्यातील 147 ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱयांचा कालावधी जानेवारी ते ऑगस्टमध्ये संपला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त झाले आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींवर सात ते आठ महिन्यांपासून प्रशासकीय राज आहे. सार्वत्रिक निवडणुकांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांना आता निवडणुकांचे वेध लागले आहेत.
जानेवारी ते डिसेंबर 2023 या वर्षभरात 195 ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱयांचा कालावधी संपणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या सर्व ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची गेल्या चार-पाच महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू केली. त्यामुळे आजमितीस 188 ग्रामपंचायतींची प्रभागरचना, आरक्षण आणि प्रभागनिहाय मतदारयादी तयार केली आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षणदेखील यापूर्वीच जाहीर झाले आहे.
राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण ग्रामपंचायती
आश्वी बुद्रूक, घारगाव, पोहेगाव, उंदिरगाव, चितळी, वारी, दाढ बुद्रूक, पिंपरी निर्मळ, उक्कलगाव, दत्तनगर, नाऊर, वाकडी, फत्याबाद, सडे, देसवंडी, वाडेगव्हाण, कान्हूर पठार, विसापूर, कोळगाव, अरणगाव, देऊळगाव सिद्धी, बारदरी, पैठण, घोटी, गुंजाळवाडी, कोंभाळणे, माळवाडी, जवळके.


























































