माखजन भागात महावितरणचे विद्युत पोल धोकादायक स्थितीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । आरवली

माखजन भागात महावितरणचे लोखंडी खांब अनेक गावात गांजले असल्याने हे धोकादायक खांब बदलण्याची मागणी करून एक वर्ष उलटले तरी खांब बदलण्यासाठी कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. तसेच अनेक ठिकाणी फ्यूज बॉक्स उघडे आहेत.

संगमेश्वर तालुक्याच्या माखजन, आरवली, धामापूर, आंबव आदी भागातील गावांमध्ये महावितरणचे कालबाह्य झालेले लोखंडी खांब गांजले असून ते केवळ विद्युत वाहिन्यांच्या आधारावर उभे आहेत. हे खांब लोकवस्तीत असल्याने ते केव्हाही कोसळून मोठी हानी होण्याची तसेच जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. याभागात मुसळधार पाऊस पडत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. धोकादायक खांब बदलण्यात यावेत असे ग्रामपंचायटीकडून कळविण्यात येऊनही महावितरणचे प्रशासन याबाबत ढिम्म झाल्याचेच चित्र आहे.

अनेक ठिकाणी फ्यूज बॉक्स उघड्या अवस्थेत आहेत. यामुळे आशा फ्यूज बॉक्सच्या परिसरात गुरांना तसेच माणसांना फिरकणे धोकादायक बनले आहे. गेल्या वर्षी कोंडीवरे येथील संतोष केंबळे या शेतकऱ्याच्या बैलाचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्यामुळे बैल मृत्युमुखी झाला. यामुळे या शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. अद्याप कोणतीच भरपाई या शेतकऱ्याला मिळालेली नाही. महावितरणच्या कारभारात कोणतीच सुधारणा होत नसल्याने तीव्र संताप निर्माण झाला आहे.