पांढरवाडी पाझर तलावातून पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त

90

सामना प्रतिनिधी । शिरुर अनंतपाळ

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील पांढरवाडी तलावातून अवैध पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त करण्याची कार्यवाही प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने येरोळ व पांढरवाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पांढरवाडी पाझर तलावाची पाणी पातळी खालावली आहे. तलावात पिण्यायोग्य अवघा २५ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. महिनाभरापुर्वीच येथील शेतकऱ्यांना पाणी उपसा न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरी देखील शेतकऱ्यांनी तलावातील विद्युत पंप काढले नाहीत. त्यामुळे ८ रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार अतुल जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीमध्ये बैठक झाली. त्यामध्ये शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चारा टंचाई, पाणी टंचाई व मनरेगा कामासंदर्भात बैठकीत आढावा घेण्यात आला. तहसीलदार अतुल जटाळे यांनी बुधवारी पांढरवाडी लघु तलावास प्रत्यक्ष भेट देऊन पाणी उपसा करणारे शेतकऱ्यांचे पाच विद्युत पंप जप्त केले.

येरोळ व पांढरवाडी गावासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या लघु तलावात अवघे २५ टक्के इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामध्ये पिण्यायोग्य अवघे १५ टक्केच पाणी आहे. याचीच दखल घेऊन मागील महिन्यात पाटबंधारे खातेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या पांढरवाडी पाझर तलावातुन पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सुचित केले होते. तरी देखील शेतकऱ्यांकडुन अवैध पाणी उपसा सुरूच ठेवला होता. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन तहसीलदार अतुल जटाळे यांच्या सुचनेनुसार पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता जाधव, नायब तहसिलदार लालासाहेब कांबळे, मंडळ अधिकारी निटुरकर, तलाठी गणेश राठोड व सदानंद सोमवंशी यांनी अवैध पाणी उपसा करणाऱ्या पाच विद्युत मोटारी व साहित्य जप्त करून संबधित शेतकऱ्यावर कारवाई केली आहे.

शेतकऱ्यांना तलावातील मोटारी काढण्यास सांगितल्या होत्या मात्र, शेतकऱ्यांनी एक महिना होऊनही तलावातील विद्युत मोटारी काढल्या नाहीत. सध्या येरोळ व पांढरवाडीला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत तलावातून विद्युत मोटारीने शेतीसाठी बेकायदा पाणी उपसा सुरूच होता. अखेर बुधवारी ८ मे रोजी सायंकाळी पथकाने तलावाच्या ठिकाणी जाऊन पाच विद्युत पंप जप्त केले आहेत तर काही शेतकरी पथक आल्याचा सुगावा लागताच मोटारी काढुन ठेवल्या. पथक कधीही येऊन अवैध पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार अतुल जटाळे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या