माळढोकच्या अस्तित्वावर विजेच्या तारांचा आघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

हवेत वेगाने झेपावणारा मोठा पक्षी अशी ओळख असलेल्या माळढोकचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे. हा पक्षी भरारी घेत असलेल्या मार्गात विजेच्या उच्च क्षमतेच्या तारा येतात. त्या तारांना धडकून हे पक्षी प्राण गमावत आहेत. गेल्या 30 वर्षांत या पक्ष्यांची संख्या 75 टक्क्यांनी घटली, अशी माहिती पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालातून उघडकीस आली आहे.

सध्याच्या घडीला देशात केवळ 150 माळढोक उरले आहेत. यातील बहुतांश पक्षी हे जैसलमेर येथे आहेत. विजेच्या उच्च क्षमतेच्या तारांना धडक बसून प्रत्येक वर्षाला जवळपास 15 टक्के पक्षी दगावतात, असे पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारित येत असलेल्या ‘वाईल्डलाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ने अहवालात म्हटले आहे. संपूर्ण देशभरात करण्यात आलेल्या विविध सर्वेक्षणांचा निष्कर्ष विचारात घेण्यात आला. प्रौढ माळढोकना अधिक अंतरावरचे कमी दिसते. त्यामुळे ते झेपावत असलेल्या मार्गातील विजेच्या उच्च क्षमतेच्या (33-440) तारा त्यांना दिसत नाहीत. परिणामी, त्या तारांना धडकून प्रौढ माळढोक प्राण गमावतात. 2017-18मध्ये एकटय़ा जैसलमेरमध्ये 5 माळढोक दगावले, असे निरीक्षण पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

येथे आढळतात माळढोक
जैसलमेर आणि राजस्थानातील पोखरणजवळील लष्कराच्या फिल्ड फायरिंग रेंजमध्ये माळढोक अधिक संख्येने आढळतात. त्याशिवाय कच्छ (गुजरात), नागपूर, अमरावती आणि सोलापूर (महाराष्ट्र), बेल्लरी व कोप्पाल (कर्नाटक), कुरनूल (आंध्र प्रदेश) या ठिकाणी जेमतेम 10 माळढोक आहेत.